#ViratKohli : मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय कोहलीच्या नावावर

अहमदाबाद  – भारतीय संघाने इंग्लंडचा दहा गडी राखून पराभव केला. या दिवसरात्र कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा हा विजय कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरला आहे. 

कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा मायदेशातील हा 22 वा कसोटी विजय होता. मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या विक्रमाची नोंद आता कोहलीच्या नावावर झाली आहे. याआधी ही कामगिरी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होती. धोनीच्या नेतृत्वाखाली मायदेशात 21 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

चेन्नईतील दुसरा सामना जिंकून कोहलीने धोनीच्या कामगिरीशी बरोबरी केली होती. आता अहमदाबादच्या कसोटी विजयासह मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. कोहली व धोनीसह महंमद अझरुद्दीन, सौरव गांगुली व सुनील गावसकर यांचाही या क्रमवारीत समावेश आहे. मायदेशात अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने 13, गांगुलीच्या 10 व गावसकर यांच्या नेतृत्वात 7 विजय मिळवले आहेत.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कोहलीच्या नावावर ही कामगिरी नोंदली गेली आहे. कोहलीच्या नेतृत्वातील 59 कसोटी सामन्यात भारताने 35 विजय मिळवले आहेत. तर, 14 सामन्यात पराभव पत्करला आहे. 10 सामने अनिर्णीत राहीले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने 60 कसोटी सामन्यांपैकी 27 सामने जिंकले असून 18 सामने गमावले आहेत. तर, 15 सामने अनिर्णीत राहिले होते. 2011 मध्ये कोहलीने धोनीच्या नेतृत्वाखाली कसोटी पदार्पण केले होते. 2014 साली धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व कोहलीला कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.