वाकड, रावेतमध्ये सर्वाधिक नवीन गृहप्रकल्प

संग्रहित छायाचित्र

शहरात गेल्या साडेसात महिन्यांत 1266 बांधकामांना परवानगी

पिंपरी – बांधकाम क्षेत्रातील मरगळ गेल्या काही महिन्यांमध्ये दूर होताना दिसत आहे. सध्या मंदीची सर्वत्र चर्चा सुरु असली तरी शहरात मात्र नव-नवीन गृहप्रकल्प उभारले जात असल्याचे दिसून येत आहे. वाकडमध्ये गेल्या साडेसात महिन्यांत सर्वाधिक 158 तर, रावेतमध्ये 106 बांधकामांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये नवीन आणि सुधारित अशा दोन प्रकारच्या बांधकाम परवानगीचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात शहरात एकूण 1 हजार 266 बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे.

शहरात सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे घरांची गरज वाढत आहे. सध्या विविध गृहप्रकल्पांच्या माध्यमातून घर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होत आहे. पन्नास लाखांच्या आतील सदनिकांना सर्वाधिक मागणी आहे. आयटी आणि संलग्न क्षेत्रातील निम्म्याहून आधिक लोकांची पुण्याला पहिली पसंती आहे. आयटी उद्योगांनी “डेस्टिनेशन पुणे’चा ध्यास घेतल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यातही पिंपरी-चिंचवड परिसरात व लगत हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, तळवडे टेक्‍नो पार्क विस्तारले आहे. त्याचप्रमाणे शहरात उद्योगांचे जाळेही मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांची घराची मागणी मोठी आहे.

शहरामध्ये चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत नवीन 565 बांधकामांसाठी महापालिकेने बांधकाम परवानगी दिली आहे. तर, 701 सुधारित बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे एकूण 1266 लहान-मोठ्या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेला बांधकाम परवानगीतून आत्तापर्यंत 460.70 कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी दिली.

परिसरानुसार सदनिकांच्या दरात चढ-उतार
शहरामध्ये विविध भागानुसार सदनिकांसाठी प्रति चौरस फुट दरांमध्ये चढ-उतार पाहण्यास मिळत आहे. सध्या बाजारात मंदीची परिस्थिती आहे. तरीही सदनिकांचे दर कमीतकमी 3 हजार ते जास्तीत जास्त 7 हजार प्रति चौरस फुटापर्यंत आहे. पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे गुरव, सांगवी आदी पट्ट्यात साडेपाच ते सहा हजार प्रति चौरस फुटाचा दर सुरू आहे. तर, मोशीमध्ये साडेतीन ते चार हजार रुपये प्रति चौरस फुट असा दर दिली. पाहण्यास मिळत आहे. किवळे येथे तुलनेत साडेतीन हजार प्रति चौरस फुट इतका कमी दर आहे. रावेतमध्ये 4 हजार 200 ते 4 हजार 500 असा दर सुरु असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)