Donald Trump । India – अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांची निवड केली आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या आगामी मंत्रिमंडळातील नावांच्या घोषणेने पाकिस्तान चांगलाच हबकला आहे. याचे कारण ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नेते असे आहेत की ज्यांच्या मनात पाकिस्तानची फारशी चांगली प्रतिमा नाही.
पाकिस्तानी धोरणकर्ते ट्रम्प यांच्या निवडीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अमेरिकन प्रशासनाच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाचे प्रतिबिंब या निवडींतूनच उमटणार आहे. आतापर्यंत ज्या नावांची घोषणा करण्यात आली आहे त्यावरून स्पष्ट संदेश जातो की ट्रम्प सरकारच्या प्राधान्य यादीत भारत अग्रस्थानी आहे. तद्वतच ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या प्राधान्य यादीत पाकिस्तानचा समावेश नसल्याचे आतापर्यंतच्या निवडींमधून स्पष्ट झाले आहे.
ट्रम्प यांचे नियोजित परराष्ट्र मंत्री, संरक्षण सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख या सर्वांचे पाकिस्तानबद्दल अत्यंत टीकात्मक विचार आहेत, तर त्यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. वॉशिंग्टनच्या परराष्ट्र धोरणात कोणतेही स्थान नसल्यामुळे, पाकिस्तानमधील उच्च सरकारी आणि लष्करी अधिकारी अमेरिकेबाबतच्या त्यांच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात पुन्हा रणनीती बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ट्रम्प यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या यादीत तुलसी गोबार्ड यांचे नाव आहे. गबार्ड यांनी पूर्वी अनेकदा पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. त्यांनीच भारताला समर्थन देणारे विधेयक आणले होते. रुबिओ यांनी सिनेटमध्ये सादर केलेल्या यूएस-इंडिया डिफेन्स कोऑपरेशन ॲक्ट नावाच्या विधेयकात चीनच्या या प्रदेशातील वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी भारतासोबत विस्तारित संरक्षण सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
या विधेयकानुसार, तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या बाबतीत भारतासह जपान, इस्रायल, दक्षिण कोरिया आणि नाटो या देशांना आघाडीचे मित्र मानण्याचा सल्ला अमेरिकेला देण्यात आला होता. संरक्षण, आर्थिक गुंतवणूक आणि नागरी क्षेत्रात सहकार्याच्या माध्यमातून नवी दिल्लीला संपूर्ण सुरक्षा मदत पुरवावी, असेही विधेयकात सुचवण्यात आले आहे.