पुणे – देशभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी केंद्र शासनाच्या अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या ई-बसेस अनुदानात महाराष्ट्र आघाडीवर आहे.
देशातील 64 शहरांत एकूण 5 हजार 595 बससाठी अनुदान जाहीर करण्यात आले असून यात एकट्या महाराष्ट्रातील 725 बसेसचा समावेश आहे. यानंतर, उत्तर प्रदेश 600, गुजरात 550, तमिळनाडू 525 तर कर्नाटक 350 या राज्यांचा क्रमांक लागतो. या अनुदानामुळे पुढील काळात पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढणार आहे. सध्या पुणे शहरात सर्वाधिक ई-बस पीएमपीच्या ताफ्यात धावत असल्याचा दावा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने नव्याने मुंबईतील बेस्टला 300, पुणे 150, नागपूर आणि नवी मुंबई प्रत्येकी 100, नाशिक 50 आणि सोलापूरला 25 बससाठी अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात राज्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत.
प्रतिबस 55 लाख रुपयांचे अनुदान
केंद्र शासनाच्या धोरणानुसार येत्या काळात देशातील सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यात येणार आहे. यासाठी, अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालयाअंतर्गत फास्टर ऍडॉप्शन ऍण्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स या स्कीमअंतर्गत इलेक्ट्रीक वाहनांना अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक आणि सोलापूर या प्रमुख 6 शहरांना 725 इलेक्ट्रिक बसेससाठी अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे प्रतिबस 55 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.