एक्केचाळीस रुग्ण चिकुनगुनियाचे
डासांची उत्पत्ती आढळल्याप्रकरणी 320 जणांना नोटीस
30 हजार 651 रुपयांचा दंड वसूल
पुणे – शहरात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या 3 आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने आणि त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे रुग्णाची संख्या वाढली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर या महिन्यात चिकुनगुनियाचे 41 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, मागील महिन्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आढळल्याप्रकरणी 320 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून 30 हजार 651 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी दिली.
डास उत्पत्ती प्रकरणी महापालिकेतर्फे खटले दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाकडूनही 20 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात जानेवारी ते ऑगस्ट 2019 अखेर डेंग्यूचे 1,926 रुग्ण आढळून आले होते. त्यातील 309 जणांना वैद्यकीय तपासणीनंतर डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर याच कालावधीत चिकणगुनियाचे 130 जण आढळून आले आहेत. तर या 8 महिन्यांत डेंग्यूचे डास आढळून आल्याप्रकरणी 1,578 जणांना नोटीस बजावण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल 3 लाख 46 हजार 301 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सर्वाधिक डास उत्पत्ती विकास कामाच्या ठिकाणी
महापालिकेने शहरात केलेल्या पाहणीत सर्वाधिक डासउत्पत्ती बांधकामे तसेच विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी आढळून आली आहेत. या ठिकाणी कामासाठी पाण्याचा साठा केला जातो. तसेच पाणी वापरले जाते. त्यामुळे महापालिकेने पावसाळा सुरू होतानाच शहरातील बांधकामे, मेट्रो, महापालिकेचे रस्ते तसेच इतर विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदारांना नोटीस बाजावली होती. तसेच खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही बऱ्याच ठिकाणी डास झाल्याचे निदर्शनास आल्याने काही जणांवर खटले भरण्यात आले, तर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.