डासांच्या उत्त्पत्तीबाबत आपण गंभीर आहोत का?

– श्रध्दा कोळेकर

पुणे – रस्त्यांवरील वाढती अस्वच्छता, पाण्याची डबकी त्यामुळेच संपूर्ण शहरात डास झाले आहेत आणि या सगळ्यांना पालिकेचा आरोग्य विभागच जबाबदार आहे, असे म्हणत अनेक जण प्रशासनालाच दोष देतात. मात्र डासनिर्मितीची कारणे आणि उत्पत्ती स्थळे शोधली, तर ती आपल्याच घर आणि कार्यालयांतच सापडतात. याबाबत आपण तेव्हाच गंभीर होतो, जेव्हा आपल्या आजुबाजूच्यांवर किंवा आपल्यावर याचे गंभीर परिणाम जाणवतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जानेवारीपासून बघितले, तर शहरात 631 जण डेंग्यूचे संशयित आहेत. तर चिकनगुनियाचेही 59 संशयित आहेत. त्यातील 92 जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. ही सरकारी आकडेवारी आहे, प्रत्यक्षात हा आकडा मोठा असण्याची शक्‍यता आहे. खासगी रुग्णालयात रोज रुग्णांची रांग असते. डेंग्यूमुळे कोणाचा जीवही जाऊ शकतो, याची सर्वांना कल्पना असताना देखील त्याबाबत आपल्याकडे याबाबत पुरेसे गांभीर्य नाही.

रस्ता, नदीपात्रातील खड्ड्यांची जबाबदारी पालिकेने घेतली, तरीही शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, घर व परिसर त्याची जबाबदारी ही ज्या-त्या नागरिकांनाच घ्यावी लागणार आहे. किंबहुना ती घेणे गरजेचे आहे. सध्या अनेक घरांच्या कुंड्यांमध्ये, फ्रिजच्या ट्रेमध्ये, भंगार सामानामध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. तसेच शाळा महाविद्यालयांतील अडगळीच्या साहित्यांत, कुंड्यांमध्येही या अळ्या सापडल्या आहेत. याबाबत पालिकेने आतापर्यंत लाखो परिपत्रके वाटली आहेत. वृत्तपत्रातून रोज जनजागृती केली जाते. मात्र, तरीही अनेक जण याबाबत गंभीर झालेले दिसत नाहीत. शासकीय कार्यालयामध्ये असणाऱ्या कुलरच्या पाण्यातही अळ्या आढळतात. मात्र, त्याकडेही कर्मचाऱ्यांचे लक्ष नसते. त्यामुळे अर्थातच याचा फटका हा निष्काळजीपणा करणाऱ्या वर्गालाच बसणार आहे.

मागील वर्षीही अशाच प्रकारे शासकीय कार्यालये, शाळा, घरांमध्ये या डेंग्यू, मलेरियाचे डास अढळले होते. याही वर्षी ती परंपरा कायम आहे. यामुळे जीव जाण्याची परंपरा कायम राहिली तर त्यात पालिकेला दोष देण्याचे किंवा ओरड करण्याचे काहीच कारण नसावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)