FIFA World Cup 2030: भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या प्रत्येक देशात चिंतेचा विषय ठरत आहे. भटकी कुत्री चावल्याने पसरणारे आजार, त्यामुळे घडणारे अपघात यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जाते. त्यातच आता मोरोक्कोने तब्बल 30 लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे.
मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये 2030 फिफा वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिडा स्पर्धांपैकी एक असलेल्या फिफा वर्ल्ड कपसाठी जगभरातून कोट्यावधी प्रेक्षक येतात. त्यामुळे मोरोक्कोकडून देश अधिक आकर्षक व स्वच्छ बनवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. यातीलच एक निर्णय म्हणजे या देशाने फिफा वर्ल्ड कपआधी 30 लाख भटकी कुत्री मारण्याची योजना आखली आहे.
फिफा वर्ल्ड कपसाठी जगभरातून येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये, तसेच, शहरं अधिक चांगली दिसावीत, यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. यावर आता प्राणी हक्क गट आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मोरोक्कोवर टीका केली जात आहे. मोरोक्कोने देशातील काही ठिकाणी हजारो कुत्र्यांना मारले असल्याचा दावाही रिपोर्टमध्ये केला जात आहे.
कुत्र्यांना पकडण्यासाठी व मारण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. रिपोर्टनुसार, कुत्र्यांना स्ट्राइकिन नावाचे घातक रसायन दिले जात असून, याचा सर्वसाधारणपणे वापर कीटकनाशक म्हणून केला जातो. तसेच, कुत्र्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या जात आहे किंवा कत्तलखान्यात पाठवले जात आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्यांकडूनही हा मुद्दा आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेसमोर उपस्थित करण्यात आला आहे. परंतु, फिफा अथवा मोरोक्कोकडून अद्याप अधिकृतरित्या यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
दरम्यान, मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल हे 2030 फिफा वर्ल्डकपचे सह-यजमान असतील. हा वर्ल्डकप विशेष असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे या स्पर्धेचे 100वे वर्ष असेल.