मास्क न वापरता घराबाहेर आल्यास दंड
पुणे – मास्क न घालता घराच्या बाहेर जरी पाऊल टाकले, तरी महापालिकेतर्फे 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याबरोबरच शहरातील पाचव्या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातील महापालिकेची उद्याने सुरू करण्यात येणार असून, “मॉर्निंग वॉक’लाही परवानगी दिली जाणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊननंतर पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरचे नव्याने आदेश महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. त्यामधील काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
नवे बदल :
– 65 प्रतिबंधितमधून 27 झोन वगळले, 28 भागात नव्याने प्रतिबंधित झोन, तर 10 झोनची पुनर्बांधणी करणार
– प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 10 ते सायं. 5 खुली.
– उर्वरित शहरातील सर्व दुकाने, वर्कशॉप, गॅरेज सम-विषम पद्धतीने सुरू राहणार
– मंडई आणि तुळशीबागही याच पद्धतीने.
– दुकाने “पी1 पी2′ याप्रमाणे उघडी.
– खासगी कार्यालये 10 टक्के मनुष्यबळावर.
– सरकारी कार्यालयात 15 टक्के कर्मचारी
– पथारी व्यावसायिकांमध्ये 5 मीटर अंतर
– तुळशीबागेत “पी1- पी2′ पद्धत. तर मंडईत गाळ्यांना जे ओटा क्रमांक आहेत, त्यातील सम-विषम प्रमाणे सुरू ठेवण्यात येणार.
वृत्तपत्रे घरोघरी मिळणार
वृत्तपत्र वितरणावरील सर्व बंधने उठवण्यात आली आहेत. आता घरोघरी वर्तमानपत्र वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा असणार नाही. स्टॉलवरील विक्रीला देखील वेळेचे बंधन नाही.
हे बंदच राहणार
शिक्षणसंस्था, शाळा, महाविद्यालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर, मॉल्स, हॉटेल्स, चित्रपटगृहे, क्रीडांगणे, जलतरण तलाव, मेट्रो, रेल्वे, व्यायामशाळा, कोचिंग क्लासेस बंदच राहणार.