सोलापूर – सोलापुरातील सहकार क्षेत्रातील हॉस्पिटल, डॉक्टर, प्रमुख पदाधिकारी आणि कारखानदार यांच्यावर गुरुवारी सकाळी आयकर खात्याने छापे टाकले. यात पंढरपुरात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच अन्य चार साखर कारखान्यांची मालकी असलेले अभिजीत पाटील यांच्यासह आणि त्यांच्या उद्योग समूहावरहीसुद्धा धाडी पडल्या आहेत.
आयकर विभागाने याबाबतची कारवाई अत्यंत गुप्तता पाळून सकाळपासून सुरू केली. या सर्व संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह आयकर विभागाचे पथक दाखल झाले. अधिकृतपणे कोणतीही माहिती प्रसार माध्यमांना आयकर विभागाकडून मिळालेली नाही.
सोलापुरात नावाजलेले हृदयरोग तज्ज्ञ यांची सहकारी रुग्णालय सेवा आहे. त्याचबरोबर त्यांचे खासगी हॉस्पिटल आहे. तर पंढरपुरातील वाळू ठेकेदार ते साखर कारखानदार असा प्रवास करणाऱ्या तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या अभिजीत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर सुद्धा धाडी पडल्या आहेत.
तसेच पाटील यांच्या उस्मानाबाद येथील कार्यालयातही आयकर खात्याची टीम पोहोचली आहे. पंढरपुरात अलीकडच्या काळात राजकीय प्रस्थ म्हणून उदयास आलेल्या पाटील या नेत्यावर पडलेल्या धाडीमुळे राजकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे. सोलापुरात हृदय रोगाशी संबंधित डॉक्टरांवर धाडी पडल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतर तज्ज्ञांचे छातीचे ठोके वाढले आहे.