48 वर्षांपुर्वी प्रभात : इस्रायल-सीरिया हवाई युद्ध

तेल अवीव, ता. 13 – इस्रायली हवाई दलाच्या जेट विमानांनी आज सीरियाची 13 मिग-21 बॉम्बर्स विमाने भूमध्य समुद्रावर पाडली, असे लष्करी प्रवक्‍त्याने आज जाहीर केले. एक इस्रायली विमान सीरियाने पाडले पण त्यातील वैमानिक सुखरूपपणे बाहेर पडला. 1967च्या युद्धानंतर पश्‍चिम आशियातील हे मोठे हवाई युद्ध होते असे वर्णन करण्यात आले आहे. सीरियातर्फे असे जाहीर करण्यात आले की, इस्रायलची 5 जेट विमाने पाडण्यात आली व सीरियाची 8 विमाने पडली.

अझीझ अहमद एवढ्यातच उलटले!

नवी दिल्ली – पाकिस्तानी कैद्यांवरील संकल्पित खटले जोपर्यंत काढून घेतले जात नाहीत तसेच पाकिस्तानी युद्धकैद्यांचे स्थलांतर होत नाही तोपर्यंत बांगला देशाच्या युनोप्रवेशास पाकिस्तान विरोधच करील, अशी घोषणा पाकिस्तानचे संरक्षण व परराष्ट्र मंत्री अझीझ अहमद यांनी आज केली.

मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर आता एकच विमान

पुणे – मुंबई-पुणे-मुंबई या मार्गावर इंडियन एअरलाइन्सच्या एकाच विमानाद्वारे वाहतूक चालू राहील. पुण्याला हे विमान रोज सायंकाळी 6.55 वाजता येथे येईल व सव्वासात वाजता येथून सुटेल. त्यात 28 प्रवाशांची सोय असेल.

सोलापूर रेल्वेविषयी बोलणी

पुणे – रेल्वेचा सोलापूर विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा या मागणीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या तीन खासदारांच्या समितीची बैठक 20 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे भरेल.

राष्ट्रपतींनी स्वखुशीने पगारकपात केली

हैदराबाद – देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी आपल्या पगारात दहा टक्‍के कपात केली. राष्ट्रपतींना महिन्याला 10 हजार रु. पगार मिळतो. त्यातील साडेसहा हजार रुपये आयकर भरावा लागतो. त्यांना आता 3150 रु. पगार मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.