पुणे – अतिवृष्टीमुळे राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २ लाख १४ हजार ९६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यापैकी फळबागांना फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानातून उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी (दि.९) पत्रकार परिषदेत दिली.
कृषी आयुक्तालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते. आतापर्यंत द्राक्षांचा समावेश फळ बागांमध्ये नव्हता. मात्र आता यांचादेखील समावेश फळबागामध्ये केला जाणार आहे.त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेता, सर्व पिके घेताना ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर करण्यावर भर देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आतापर्यत राज्यात २४ लाख २० हजार ठिबक सिंचन झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कोकणातील काजू लागवडीला मिळणारा भरघोस प्रतिसाद लक्षात घेता, त्याठिकाणी देखील ठिबक सिंचन योजना लागू केली जाणार आहे.