पिंपरीत बारा हजाराहून अधिक करोनामुक्‍त

प्लाझ्मादानासाठी पुढे आले केवळ ४७ : २३ दिवसांत ९१ प्लाझ्मा थेरपी

पिंपरी – देशात ‘करोना’चा शिरकाव झाल्यानंतर केंद्र, राज्य सरकारांपासून ते महापालिकेपर्यंत संपूर्ण यंत्रणेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच शहरातील करोनाबाधितांचा मृत्यू दर दोन टक्‍क्‍यांहूनही कमी आहे. शहरातील बारा हजाराहून अधिक तर शहराबाहेरील नऊशेहून अधिक रुग्ण करोनावर मात करत घरी परतले आहेत. यापैकी बहुतेक रुग्णांना महापालिकेने मोफत उपचार दिले. उपचारादरम्यान भोजन व इतर सुविधाही मोफत देण्यात आल्या. एवढे रुग्ण बरे होऊन घरी परतले असताना इतर गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या प्लाझ्मादानासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या केवळ ४७ इतकी अत्यल्प आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ५ जुलैपासून प्लाझ्मा थेरपीला सुरवात झाली. मंगळवारपर्यंत (दि. २८) ४७ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. तर, ९१ प्लाझ्मा थेरपी करण्यात आल्या आहेत. प्लाझ्मा दान करोना आजारातून बरे झालेले रुग्णच करू शकतात. मात्र, संबंधित आजारातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दानासाठी अपेक्षित संख्येने पुढे येत नसल्याने वायसीएममधील प्लाझ्मा थेरपीवर मर्यादा येत आहेत.

करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरामध्ये करोना विषाणूचा प्रवेश झाला की त्या विषाणूला नष्ट करण्यासाठी शरीरात सैनिकी पेशी तयार होतात. त्यालाच वैद्यकीय भाषेत “ऍन्टीबॉडीज’ म्हणतात. या “ऍन्टीबॉडीज’ रक्तातल्या प्लाझ्मा नावाच्या घटकामध्ये असतात. प्लाझ्मा थेरपीमध्ये करोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरात निर्माण झालेल्या प्लाझ्मा ऍन्टीबॉडीज करोनाची लागण झालेल्या रुग्णाला दिल्या जातात, अशी माहिती “वायसीएम’चे प्रवक्ते तथा दंतरोग विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी दिली.

कोण करू शकते प्लाझ्मादान ?
करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा २८ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना प्लाझ्मा दान करता येते. दर पंधरा दिवसांच्या अंतराने जास्तीत जास्त तीन ते चार वेळा प्लाझ्मा दान करता येते. करोनातून बरे झालेले रुग्ण पुढील तीन महिन्यापर्यंतच प्लाझ्मा दान करू शकतात. एखाद्या रुग्णाला प्लाझ्माचा एक डोस पुरेसा होतो. तर, काही रुग्णांना दोन किंवा तीन डोस देखील लागू शकतात.

शहरातील दोन रक्तपेढ्यांना परवानगी
पुणे विभागातील मिरज, कोल्हापूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील एकूण ८ रक्तपेढ्यांना करोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा काढण्यासाठी आवश्‍यक प्रक्रियेसाठी परवानगी दिली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी आणि आदित्य बिर्ला रुग्णालय रक्तपेढी यांना त्यासाठी परवानगी आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे (पुणे) सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.

प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याची गरज
शहरामध्ये बुधवार सायंकाळपर्यंत एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १९ हजारांपुढे जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये करोनामुक्त झालेले रुग्ण हे १२ हजारांपेक्षा आधिक आहेत. सक्रिय रुग्ण तीन हजारांपेक्षा आधिक आहेत. तर, तीनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचार सुरू असताना दगावले आहेत. जवळपास ८२ रुग्ण अत्यवस्थ आहेत. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे असतानाही प्लाझ्मा दानासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे. प्लाझ्मा दानासाठी करोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुढे येण्याची गरज आहे.

“करोना आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरामध्ये “ऍन्टीबॉडीज’ तयार झालेल्या असतात. या “ऍन्टीबॉडीज’ रक्तातल्या “प्लाझ्मा’ नावाच्या घटकामध्ये असतात. करोनाबाधित ज्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपीची गरज असते त्यांच्यावर या उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. एखाद्या रुग्णाला प्लाझ्माचा एक डोस पुरेसा होतो. तर, काही रुग्णांना अधिक डोस देण्याची गरज भासते.”
– डॉ. संजीव दात्ये

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.