पंधरा महिन्यांत एक हजारांहून अधिक परवाने रद्द

बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई ः दररोज होतेय तीन जणांवर कारवाई

पिंपरी – वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर आरटीओकडून कडक कारवाई येण्यात येत आहे. गेल्या 15 महिन्यांमध्ये तब्बल 1010 वाहन चालकांचे परवाने रद्द केले आहेत. बेशिस्त वाहन चालकांचे परवाने आरटीओकडून (उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) रद्द करण्याचा कार्यालयाने सपाटा लावला आहे. जानेवारी 2018 ते डिसेंबर 2019 पर्यंत कार्यालयाकडून 623 परवाने तर, 2019च्या मार्चअखेर पर्यंत 387 असे एकूण 1 हजार 10 परवाने 15 महिन्यात रद्द करण्यात आले आहे.

बेशिस्तपणे वाहन चालवत स्वत:सह इतरांसाठीही धोकादायक ठरत असलेल्या वाहन चालकांवर पिपंरी-चिंचवड परिवहन कार्यालयाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. अनियंत्रितपणे वाहने चालविणे, मद्यपान करुन वाहन चालविणे (ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह) वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे अशा गुन्ह्यांसाठी चालकांवर वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. त्यानंतर संबंधित चालकांचे परवाने आरटीओ कार्यालयाकडे निलंबनाच्या कारवाईसाठी पाठवले जातात. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर पर्यंत 623 वाहन परवाने आरटीओ कार्यालयाकडून रद्द करण्यात आले तर, 2019 च्या मार्च पर्यंत 387 परवाने आरटीओकडून रद्द करण्यात आले आहे.

वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यावर एक ते तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्यात येते व कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येते. हाच गुन्हा वारंवार केल्यास वाहन परवाना कायमचा रद्द करण्याचे अधिकारही कार्यालयाला असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास एका महिन्यापासून ते तीन महिन्यांपर्यंत वाहन परवाना रद्द करण्यात येतो. तीन वेळेस नियमांचे उल्लंघन होत असल्यास वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येतो.

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येते. अशा वृत्तीच्या चालकांमुळेच अपघात होतात. यामुळे कारवाई करणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करत आपल्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. परवाना रद्द होणे ही अपमानजक बाब असून नागरिकांनी वाहतूक नियम पाळावे.

– आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.