पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर, शहरातील विविध प्रकल्पांबद्दल भोसरी परिसरातील १२० शाळांमधील एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली मते व्यक्त केली.
निबंध, वक्तृत्व आणि चित्रकलेच्या माध्यमातून देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनी विकास प्रकल्पांबद्दल त्यांना असलेल्या माहितीची व कलागुणांची चुणूक दाखविली. More than one lakh students , expressed their opinions ,
शहराबद्दल तुम्हाला काय वाटते? शहरातील कोणते प्रकल्प तुम्हाला आवडतात? या प्रकल्पांमधून तुम्ही काय बोध घेतला? प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? असे अनेक प्रश्न भोसरी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसमोर ठेवले आणि तब्बल एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि आपली मते व्यक्त केली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसापासून ते महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत देशभरात सेवा-सुरक्षा-समर्पण पंधरवडा साजरा केला जातो. समाजामध्ये सेवा कार्याचे महत्व वाढावे आणि राष्ट्राप्रती समर्पण भावना जागृत व्हावी.
तसेच, नागरी सुरक्षाबाबत जनजागृती करावी. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशव्यापी उपक्रम राबवले जातात.
भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार महेश लांडगे यांनी हा उपक्रम सक्षमपणे राबवला. सेवा सुरक्षा समर्पण पंधरवड्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले.
आमदार लांडगे यांच्या पुढाकारातून शहरातील महापालिका आणि खासगी शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी चक्क शहरात उभारल्या जाणाऱ्या संविधान भवनाबाबत निबंध आणि चित्रकलेतून आपले मत व्यक्त केले.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने लाभदायक स्पर्धा
या उपक्रमाच्या समन्वयक श्रद्धा पानमंद म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड शहराची भौतिक संरचना, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून साकारलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ हा कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, संविधान भवन व इंटरनॅशनल लायब्ररी,
नमामी इंद्रायणी, छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’, मेट्रो सिटी पिंपरी-चिंचवड, स्पोर्ट्स हब पिंपरी-चिंचवड, क्लिन सिटी-ग्रीन सिटी, आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भर पिंपरी-चिंचवड,
एज्युकेशन हब, देव-देश- धर्म अन् संस्कृती, चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकासाचे रोल मॉडेल, जलस्वयंपूर्ण पिंपरी-चिंचवड, ऑटो, आयटी अन् इंडस्ट्रिअल हब यांसारखे विषय विद्यार्थ्यांसमोर होते.
यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. प्रकल्पांचा अभ्यास करावा आणि त्यातून त्यांना नवनवीन कल्पना सुचाव्यात. ज्याचा शहर विकासाच्या दृष्टीने देखील फायदा होईल, असे स्पर्धांचे स्वरुप आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने सुरू आहे. त्यासंदर्भात महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याबाबत जनजागृती व्हावी. नव्या पिढीला शहरातील प्रकल्प आणि त्यांची भविष्यातील उपयोगिता याबाबत माहिती मिळावी.
यासाठी आम्ही ‘सेवा-सुरक्षा-समर्पण’ पंधरवड्यानिमित्त शालेय स्पर्धा आयोजित केल्या. त्याला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि शाळांनी प्रतिसाद दिला.
सदर अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘बलशाली भारत’ घडवण्यासाठीचा छोटासा प्रयत्न आहे. – महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.