पिंपरी – करोना रुग्णांची दैनंदिन वाढ आटोक्यात आलेली आहे. असे असतानाही अजूनही शहरात करोनाचे 577 रुग्ण आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड उपलब्ध होत नव्हते.
त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता मोठ्या प्रमाणात बेड शिल्लक असतानाही निम्म्याहून अधिक रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.
अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका टळलेला नाही, दिवाळीमुळे गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितीत गृह विलगीकरणातील रुग्ण बाहेर फिरल्यास किंवा इतरांच्या संपर्कात आल्यास करोनाचा प्रसार वाढू शकतो.
शुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महापालिकेच्या अहवालानुसार शहरात 577 रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी 286 रुग्ण हे कोविड सेंटर आणि रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 291 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील तीनशेपेक्षा अधिक करोना बाधित गृह विलगीकरणात आहेत. जर गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन केले नाही तर संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
शहरातील करोना बाधितांची संख्या गेल्या आठवड्यात 50 पेक्षा कमी होती. या आठवड्यात आता ती पुन्हा हळू हळू वाढताना दिसत आहे. निर्बंध शिथील झाल्याने व बाधितांचीही संख्या कमी होत असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. दिवाळी सणाच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी असल्याने गुरुवार, रविवारी येथे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. अनेकजण नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
सुरुवातीच्या काळात गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. तसेच अगदी सुरुवातीच्या काळात बाधिताने बाहेर फिरु नये याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात होती. परंतु सध्या तसेही काही आढळत नाही.
यामुळे करोना बाधित बाहेर फिरत असल्यास देखील कुणाला कळणार नाही. करोनाबाधित जर बाहेर फिरु लागले तर त्यांचा संसर्ग इतरांना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बेड उपलब्ध असतानाही बाधितांना गृह विलगीकरणात का ठेवले जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.