आळंदी, (ज्ञानेश्वर फड/एम. डी. पाखरे ) दि. 20 –
कैवल्याचा पुतळा,
प्रगटला भूतळा।
चैतन्याचा जिव्हाळा,
ज्ञानोबा माझा ।।
ज्ञानियाचा शिरोमणी,
वंद्य जो का पूज्यस्थानीं ।।
चिंतकांचा चिंतामणी,
ज्ञानोबा माझा ।।
संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारीसाठी पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांनी तीर्थक्षेत्र आळंदीतहजेरी लावली. करोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वारी सोहळा होत असल्याने अलंकापुरीत एकादशीच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
अवघ्या पंचक्रोशीत चोहीकडे हरिनामाचा गजर सुरू आहे. ठिकठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. एकादशीच्या दिवशी राज्यभरातून आलेले पालखी सोहळे, दिंड्या, भाविक दिवसभर नगरप्रदक्षिणा करत असल्याचे दिसून आले. यावेळी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली होती. माऊली…माऊली… पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम… निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम… ज्ञानोबा तुकोबा एकोबा… असा जयघोष ठिकठिकाणी ऐकू येत होता. डोक्यावर तुलसी घेतलेल्या महिला, गळ्यात वीणा, टाळ, पखवाज अडकवलेले भाविक सर्वत्र दिसत होते. सर्वांच्या मुखात हरिनाम होते. परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
पहाटे अडीचपासून भाविकांना दर्शन
पहाटे अडीच वाजता दर्शन बारीतील भाविक भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात आले. यावेळी मंदिर आणि मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्तिकी एकादशीनिमित्त दुपारी उपवास नैवेद्य दाखवून माऊलींची पालखी नगरप्रदिक्षणा करण्यासाठी मार्गस्थ झाली. यावेळी प्रदक्षिणा रस्त्यावर भाविकांची अलोट गर्दी झाली होती. यावेळी वारीला आलेल्या दिंड्या, भाविक दिवसभर नगरप्रदक्षिणा करत होते. त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावर भाविक मोठ्या प्रमाणावर होते. रात्री आठच्या सुमारास प्रदक्षिणा करून पालखी मंदिरात आल्यावर धुपारती झाली. मोझे कुटुंबीयांतर्फे जागर झाला. दरम्यान, द्वादशीच्या दिवशी मंगळवारी (दि. 22) पहाटे साडेतीन ते चार या वेळेत प्रांत विक्रांत चव्हाण हे शासकीय महापूजा करतील.
वैष्णवांनी फुलला इंद्रायणी घाट
कार्तिकी एकादशीनिमित्त माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रविवारी (दि. 20) पहाटेपासूनच स्नानासाठी इंद्रायणी घाटावर मोठी गर्दी झाली होती. कडाक्याच्या थंडीतही भाविक इंद्रायणीत डुबकी मारत होते. इंद्रायणीच्या दुतर्फा स्नानासाठी गर्दी झाली होती.
सर्वच रस्ते भाविकांनी तुडुंब
वारीला आलेले भाविक आळंदी शहरासह आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे शहराला जोडणारे वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, चाकण रस्ता, पुणे रस्ता, देहू रस्ता भाविकांनी तुडुंब भरलेले होते. टाळ, पखवाजाच्या निनादात भाविक, वारकरी हरिनामाचा जयघोष करत होते. सर्व रस्त्यांवर भाविक ये-जा करत होते.
पंचक्रोशीत हरिनामाचा गजर
माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील सर्व धर्मशाळा, वारकरी आश्रमामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रंदिवस हरिनामाचा गजर सुरू आहे. काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम सुरू असून सर्वत्र माऊली आणि विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. ज्या भाविक, वारकरी यांची राहण्याची कुठेही सोय नाही असेही अनेक भाविक मिळेल तेथे धार्मिक कार्यक्रम करत होते.
माऊली मंदिरात आज होणारे कार्यक्रम
कार्तिक वद्य द्वादशी सोमवार, दि. 21 पहाटे 2 ते 3.30 पवमान अभिषेक व दुधारती. पहाटे 3.30 ते 4 खेड तालुका प्रांत यांच्या हस्ते पंचोपचार पूजा. पहाटे 3 ते 6 नांदेडकर मंडळींची दिंडी क्र. 15 यांच्या वतीने मुक्ताई मंडपात काकडा भजन. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. दुपारी 4 ते सायं. 7 रथोत्सव. दुपारी 4 ते 6 हभप हरिभाऊ बडवे यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन. रात्री 8.30 पालखीचे मंदिरात आगमनानंतर धूपारती. रात्री 9 ते 11 हभप केंदूरकर महाराज यांच्या वतीने कीर्तन. रात्री 11 ते 12 श्रींचे गाभाऱ्यात पास धारकांसाठी खिरापत पूजा, प्रसाद वाटप. फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप, आदी कार्यक्रम होणार आहेत.
टाळ-पखवाजाचा निनाद
एकादशीसाठी आलेले भाविक सकाळपासूनच नगरप्रदक्षिणा करत होते. विविध दिंड्याच्या प्रदक्षिणा सुरू होत्या. दुपारी 2 वाजताच्या सुमारास माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणासाठी मंदिराबाहेर आली त्यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. खांद्यावर पताका, गळ्यात वीणा, टाळ, पखवाज, डोक्यावर तुलसी घेऊन महिला पुरुष नगरप्रदक्षिणा करत होते.
नगरप्रदक्षिणा उत्साहात
रात्री 12 ते 2 यावेळेत 11 ब्रम्हवृंदाच्या वेदघोषात माऊलींना महापूजा (पावमान अभिषेक व दुधारती) घालण्यात आली. यावेळी माऊली मंदिरात नेत्रदीपक रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. महाद्वार आणि मंदिरात केलेली आकर्षक फुलांची सजावट, आकर्षक रांगोळी आणि सनई चौघड्याच्या सुमधुर आवाजात माउलींच्या समाधीवर महापूजा करण्यात आली. यावेळी रात्री 11 वाजता दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. नंतर स्वकाम सेवेच्या स्वयंसेवकांनी मंदिर स्वच्छ केले. पहाटे 1 वाजता चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक 11 ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला
आकर्षक रूप साकरण्यात आले होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, डीसीपी विवेक पाटील, एसीपी प्रेरणा कट्टे, पालखी सोहळामालक बाळासाहेब पवार, व्यवस्थापक माऊली वीर, बाळासाहेब चोपदार, माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.