पावसातही भीमाशंकरला लाखाहून भाविक

पहिल्या श्रावणी सोमवारी घेतले शिवलिंगाचे दर्शन

भीमाशंकर – सह्याद्रीच्या कुशित वसलेल्या बारा ज्योतिर्लिंपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी यात्रेत पहाटेपासून एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.

जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय, हर हर महादेव या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पहाटे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या हस्ते आरती केल्यानंतर दर्शन बारीची रांग सुरु करण्यात आली. ही रांग मंदिरापासून शिवशक्ती हॉटेलपर्यंत गेली होती. मंदिर व परिसरामध्ये लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

भीमाशंकरमध्ये पूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्यात आली आहे. भीमाशंकर देवस्थानकडून वाहने पार्किंगच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना व पोलीस मित्र सुरक्षा रक्षकांना व सर्व शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना जेवणाची सोय करण्यात आली होती. मंदिरामध्ये भाविकांना दर्शन सोपे जावे यासाठी सकाळी 8 ते 4 अभिषेक बंद करण्यात आले होते. भाविकांचे त्वरित दर्शन व्हावे यासाठी पासची सुविधा करण्यात आली होती. देवस्थान तर्फे पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांना रेनकोट व बॅटऱ्या देण्यात आल्या, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली

वाहतुकीच्या नियोजनासाठी व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार वाहनतळ बनवण्यात आले होते. एक वाहन तळ दुचाकीसाठी, तीन लहान वाहनांसाठी व एक वाहनतळ एसटी बस व मोठ्या वाहनांसाठी करण्यात आला होता. बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात होती. मद्यधुंद चालकांची तपासणी करण्यात आली. श्रावणी यात्रेनिमित्त अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मद्यपिंची संख्या वाढली आहे. त्यावर आता पोलिसांनी वचक निर्माण करण्यासाठी पावले उचलेली आहेत. यात्रेला मद्यप्राशन करुन धागड धिंगा घालणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले. दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. परिसरामध्ये दाट धुके पसरले होते. दहा ते पंधरा फुटांच्या पुढचे अजिबात दिसत नव्हते. त्यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना फार कसरत करावी लागत होती.

खेडचे तहसीलदार सुचित्रा आमले व आंबेगावचे तहसीलदार अप्पासाहेब समींदर, आंबेगावचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी यात्रा काळात दिवस भराचे नियोजन व्यवस्था केली.

भीमाशंकरसाठी 20 मिनी बस
दर वर्षी श्रावण महिन्यात वाहनतळ ते बसस्थानक या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या मिनी बसद्वारे वाहनतळ ते एसटी स्टॅंडपर्यंत ने-आण करण्याचे नियोजन केले गेले होते. एसटी महामंडळाकडून यावर्षी भीमाशंकर विकास आराखड्यातून कायम स्वरुपी भीमाशंकरसाठी 20 मिनी बस देण्यात आल्या यावर्षी भीमाशंकर देवस्थान संस्थानकडून 10 खासगी मिनी बसची विनामूल्य सोय पार्किंग ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत करण्यात आली होती. जिल्ह्याच्या प्रमुख ठिकांणावरून भाविकांसाठी जादा बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या.

खेड, घोडेगाव पोलिसांकडून बंदोबस्त
गाभारा व मंदिर परिसरामघ्ये खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी व देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांन मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा काळामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्ग दर्शनाखाली 12 अधिकारी 150 महिला व पुरूष पोलीस कर्मचारी, 25 होमगार्ड व पोलीस मित्रएवढा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरामध्ये बॉंब शोधक पथक व डॉग स्कॉड, मेटल डिटेक्‍टरद्वारा तपासणी करण्यात येत होती.

सर्वच विभाग अलर्ट
– आळंदी येथी स्वकाम सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनिल तापकिर यांच्या मार्गदर्शना खाली 28 महिला, पुरूष कार्यकर्ते मंदिर परिसर व दर्शन बारी स्वच्छ करण्याचे काम करत होते प्रशासनाकडून 108 रूग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती
– पंचायत समिती आंबेगाव व खेड यांच्यातर्फे टॅंकरची सोय करण्यात आली होती
– आरोग्य विभागाच्या पथकाकडून हॉटेलांच्या अन्नपदार्थ व पाण्याची तपासणी केली जात होती, आंबेगाव व खेड तालुक्‍याचे 40 आरोग्य कर्मचारी कार्यरत होते
– भीमाशंकर वन्यजिव विभाग 1 अधिकारी, 12 कर्मचारी व ग्रामविकास समिती सदस्य यांच्या मार्फत जंगल परिसरात सफाईचे काम करत होते
– वीज महामंडळाचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळित राहावा यासाठी काम करत होते
– बाबा अमरनाथ भंडारा सेवा समिती मंचर यांच्या मार्फत भाविकांना मोफत फराळाचे वाटप करण्यात येत होते, पिण्यासाठी मिनरल वॉटरची सोय करण्यात आली होती
– गर्दी वर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी मनोरे उभारण्यात आले होते

Leave A Reply

Your email address will not be published.