इस्लामाबाद – स्पेनला जाण्यासाठी निघालेली शरणार्थ्यांची बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत पाकिस्तानच्या ४० शरणार्थ्यांना जलसमाधी मिळाली आहे. मोरोक्कोजवळ बुडालेल्या या बोटीमधील किमान ५० शरणार्थ्यांना जलसमाधी मिळाली असावी, असे शरणार्थ्यांसाठीच्या संघटनेने म्हटले आहे.
मोरोक्कोच्या दाखला या बंदराजवळ असताना ही बोट बुडाली. मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी आदल्याच दिवशी दुर्घटनाग्रस्त बोटीतील ३६ प्रवाशांना वाचवले होते. ती बोट मोरिटानिया येथून २ जानेवारीला निघाली होती. त्यामध्ये ८६ शरणार्थी होते. त्यापैकी ६६ पाकिस्तानी होते.
मरण पावलेल्यांपैकी ४४ जण पाकिस्तानी होते, असे वॉकिंग बॉर्डर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हेलेना मलेनो यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कोणी तरी मदतीला येईल, या आशेने या शरणार्थ्यांनी १३ दिवस काढले होते, असे त्या म्हणाल्या.
पाकिस्तानी दूतावास मोरोक्कोमधील स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे पाक परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
वाचलेल्या पाकिस्तानी आणि अन्य शरणार्थ्यांना दाखला येथील छावणीमध्ये नेण्यात आले आहे. पाकिस्तानी नागरिकांना मदत पुरवण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे पथक मोरोक्कोला रवाना झाले आहे. मानवी तस्करांच्या मदतीने धोकादायक सागरी मार्गांनी युरोपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात करताना दरवर्षी शेकडो पाकिस्तानी स्थलांतरितांचा मृत्यू होतो.