देशात एका दिवसात करोना लसींचे 2 कोटींहून अधिक डोस

नवी दिल्ली – देशातील नागरिकांना शुक्रवारी करोनालसींचे 2 कोटींहून अधिक डोस देण्यात आले. एका दिवसातील लसीकरणाचा तो देशातील नवा उच्चांक ठरला. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी ती घडामोड घडली. त्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याच्या संकल्पाला आणखी बळ मिळाले.

देशात याआधी तीनवेळा एका दिवसात करोनालसींचे 1 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. त्या संख्येला शुक्रवारच्या लसीकरणाने खूप मागे टाकले. को-विन पोर्टलवर शुक्रवारी सायंकाळी 5.27 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डोस संख्येने एका दिवसातील 2 कोटींचा टप्पा ओलांडला. त्यानंतरही लसीकरणाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे डोस संख्येत आणखी भर पडेल. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या डोसचा आकडा 79 कोटींच्या घरात पोहचला आहे.

देशातील करोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारीला झाला. त्यानंतर पहिल्या 10 कोटी डोसचा पल्ला गाठण्यास देशाला 85 दिवसांचा कालावधी लागला. त्या मोहिमेला पुढील काळात वेग आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. डोस संख्येने 60 कोटीपासून 70 कोटीपर्यंत मजल मारण्यास केवळ 13 दिवस पुरेसे ठरले. आता अवघ्या 10 दिवसांत देशात तब्बल 9 कोटी डोस देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.