यान्गोन – म्यानमारच्या लष्कराने शनिवारी ठिकठिकाणी केलेल्या गोळीबारात 100 पेक्षा अधिक आंदोलक ठार झाले. मात्र रविवारी आणि आजही पुन्हा मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले असून त्यांनी लोकशाही पुनर्स्थापनेच्या आपल्या मागणीसाठीचे आंदोलन पुन्हा सुरूच ठेवले आहे.
यान्गोन आणि मंडाले या दोन शहरांसह अन्यत्र आंदोलनाचा भडका उडालेला असून आंदोलक आता लष्कराच्या दडपशाहीला जुमानेनासे झाले आहेत. शनिवारी देशभरात लष्करी गोळीबारात तब्बल 114 जण ठार झाले आणि त्यामध्ये 16 वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा स्थापन करावे आणि अटक केलेल्या नेत्यांची सुटक व्हावी, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात लष्कर आणि पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या 420 इतकी झाली आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ ग्युटरेज, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आदींनी या रक्तपाताचा तीव्र निषेध केला आहे.