अबुजा (नायजेरिरया) – नायजेरियाच्या वायव्येकडील भागात रस्ते अपघातात उलटलेल्या पेट्रोलच्या टँकरमधून पेट्रोल घेण्याचा प्रयत्न अनेक जणांच्या जीवाशी आला आहे. पेट्रोल घेतले जात असताना या टँकरचा प्रचंड स्फोट झाला आणि त्यामध्ये तब्बल १०० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या स्फोटात ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. नायजेरियातल्या आपत्कालिन सेवेशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहीती दिली.
जिगावा राज्यातील माजिया शहरात मध्यरात्री महामार्गावरून प्रवास करताना टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, असे स्थानिक पोलिस प्रवक्ते लावन आदम यांनी सांगितले.
टँकरच्या प्रचंड स्फोटामध्ये ९७ जण घटनास्थळी जळून राख झाले तर आठ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला, असे जिगावा राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख डॉ. हारुणा मैरिगा यांनी सांगितले.
महामार्गावर पेट्रोलच्या टँकरचा अपघाताची माहिती समजल्यावर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गळती होणाऱ्या टँकरमधून इंधन भरायला सुरुवात केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. स्फोट इतका तीव्र होता, की मृतांपैकी अनेकांची ओळख देखील पटवली जाऊ शकली नाही. त्यामुळे सामुदायिक दफन करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.
आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये प्राणघातक टँकर अपघात सामान्य आहेत. तिथे अनेक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही आणि मालवाहतूक करण्यासाठी सक्षम रेल्वे प्रणालीसारख्या पर्यायांचा अभाव आहे. अशा अपघातांनंतर गळती होणाऱ्या टँकरमधून बादल्या वापरून इंधन घरी घेऊन जाणे देखील सामान्य आहे. नायजेरियामध्ये इंधनाचे भाव प्रचंड वाढलेले असल्यामुळे लोक अशी धोकादायक पावले उचलत असतात.