पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. शहराचा विकास पुन्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच होऊ शकतो, याची खात्री मतदारांना असल्यामुळे या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळाव्यात अजित गव्हाणे बोलत होते. गव्हाणे म्हणाले, गतवेळी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी थापा मारल्या आणि खोटी आश्वासने दिली. महापालिकेत सत्ता आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांपैकी एकही काम ते करू शकले नाहीत. गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रत्येक कामांत भ्रष्टाचार करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले आहे. यामुळे शहराची पुरती अधोगती झाली.
राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागस्तरावर काम सुरू आहे. प्रभागरचना आणि आरक्षणही आपल्याला अडचणीचे ठरणार नसल्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील आणि आपलाच महापौर होईल याची खात्री आहे. जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांसह तरुणांना अधिकची संधी दिली जात असल्याने पक्षामध्येही चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांचा विश्वास यावर महापालिकेत सत्ता येईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपकडून भ्रष्टाचाराचा कहर – योगेश बहल
राष्ट्रवादीचे समन्वयक तथा प्रवक्ते योगेश बहल भाजपवर टीका करताना म्हणाले की, करोना काळात भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेची लूट केली. त्यानंतर कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार केला. शिक्षणमंडळ, आरोग्य, वैद्यकीय विभाग, स्मार्ट सिटी सेंटरसारख्या प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शहरातील जनता यावेळी थारा देणार नसून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा दावाही बहल यांनी केला.