वेल्हे : वेल्हे तालुक्यात कोरोनाचा कहर चालूच आहे .तालुक्यात कोरोना रूग्णांनी शंभरी पार केले असून एकाच दिवसात तब्बल १७ बाधित झाले आहेत. एका दिवसातील एवढ्या मोठ्या संख्येने रूग्ण आढळणे ही तालुक्यातील पहीलीच वेळ आहे. साधरण जास्तीत जास्त पाच ते दहा रूग्णांना लागण झाल्याची नोंद होत होती.
पावसाळा चालू झाला आणि तालुक्यातील नागरिकांना सर्दी,खोकला,ताप यांसारखी लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसू लागली.आरोग्य विभागाकडून अशी लक्षणे असणाऱ्यांचा सर्वे चालू झाला. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची माहीती मिळू लागली आहे. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढत चाललेला आकडा चिंता व्यक्त करणारा आहे. कोरोनाची साखळी तुटली नाही तर अतिमागास असलेल्या वेल्हे तालुक्याला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
शनिवार (दि.२५) रोजी तालुक्यातील वांजळे ४,वांगणीवाडी ३,दापोडे ३,ओसाडे ३, साईव(पडाळवाडी)१, निगडे मोसे २, साखर १ असे एकूण 17 जणांना कोरोनाची लागण झाली असून ४२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
वेल्हे तालुक्यात आतापर्यंत ११२ रूग्णांना कोरोनाची लागण झाली असून ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ६३ जण उपचार घेत आहेत. तालुक्यातील रूग्णांची वाढती संख्या पाहून ३१ जुलैपर्यंत संचारबंदी राहणार आहे. यामध्ये अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे म्हणाले.