Corona Virus : आखाती देशांमध्ये करोना विरोधात अधिक कठोर निर्बंध

दुबई – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखाती देशांमध्ये अधिक कठोर उपाय योजना लागू केल्या गेल्या आहेत. इतर देशांच्या तुलनेत आखाती देशांमध्ये करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी आहे.

मात्र नवीन वर्षाला सुरुवात झाल्यापासून तेथील करोनारुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आखाती देशांमध्ये लसीकरणासाठी दरडोई खर्च तुलनेने अधिक असल्यामुळे पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू करण्याचा निर्णय बहुतेक आखाती देशांमध्ये घेण्यात आला आहे.

सौदी अरेबियाने 20 देशांमधील नागरिकांना कालपासूनच प्रवेशबंदी लागू केली आहे. लग्न समारंभ आणि पार्ट्यांवरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. शॉपिंग मॉल, जीम आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे 10 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत.

हा कालावधी अधिक वाढवला जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दफनभूमीपासून 100 मीटर अंतरावर दहनविधी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सौदीमध्ये जानेवारीमध्ये दररोज 100 करोना बाधित सापडत होते. मात्र बुधवारी ही संख्या 300 पर्यंत पोहोचली.

कुवेतमध्ये दोन आठवड्यांसाठी विदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय पुढील महिन्याभरापर्यंत रात्रीचे व्यवहारही थांबवण्यात आले आहेत. हेल्थ क्‍लब, स्पा, जीम बंद करण्यात आले असून 25 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय दिन साजरा करण्यावरही बंदी घातली गेली आहे. या निर्बंधांचे पालन न केल्यास पुन्हा करोनाची स्थिती गंभीर होऊ शकते, असे आरोग्यमंत्री डॉ.बसेल अल सबाह यांनी म्हटले आहे. कुवेतमध्ये 1 लाख 66 हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे.

कतारमध्येही दैनंदिन व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कतारमध्ये आता दिड लाखाच्या आसपास करोना रुग्ण आहेत. ओमानने जानेवारीच्या मध्यापासूनच देशाच्या सीमा बंद केल्या आहेत.

करोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याची काही उदाहरणे तेथे आढळली असल्यामुळे अधिक सतर्कता बाळगली जाते आहे. परदेशातून आलेले काही जण ‘ट्रॅकिंग ब्रेसलेट’ काढून टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव होत असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. अहमद बिन मोहंम्मद अल सैदी यांनी म्हटले आहे.

संयुक्‍त अरब अमिरातीने गेल्या वर्षी जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला पुन्हा सुरुवात केली होती. मात्र या आठवड्यापासून दुबईतील सर्व पब आणि बार संपूर्ण फेब्रुवारी महिन्यासाठी बंद करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.