वॉशिंग्टन – करोना विषाणूचा फैलाव मुलांच्या माध्यमातून अधिक वेगाने होऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. प्रौढ व्यक्तींपेक्षा युवकांना करोनाचा धोका अधिक असू शकत नाही, असे पूर्वी संशोधकांनी म्हटले होते. मात्र लहान मुलांच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार शक्य असल्याचे “जर्नल ऑफ पॅडेएट्रीक्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये म्हटले आहे.
लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना करोना विषाणूचा संसर्ग सहज होऊ शकतो आणि ते गंभीर आजारी पडू शकतात, या गृहितकाला देखील या अभ्यासामध्ये आव्हान देण्यात आले आहे. 0 ते 22 वयोगटातील 192 मुलांच्या अभ्यासामध्ये 49 मुलांना करोनाची लागण झालेली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याबरोबर 18 मुलांन कोविडशी संबंधित आजारही होते, असे अमेरिकेतील मॅसेच्युसेट जनरल हॉस्पिटलने म्हटले आहे.
कोविड -19 उपचारासाठी रुग्णालयात “आयसीयू’मध्ये रूग्णालयात दाखल झालेल्या प्रौढांपेक्षा संक्रमित मुलांच्या श्वसन मार्गामधील विषाणूंचे प्रमाण लक्षणीय असल्याचे निदर्शनास आले होते. नाक आणि घशातील स्राव, तसेच रक्ताच्या नमुन्यांच्या तपासणीद्वारे ही बाब स्पष्ट झाली आहे. शाळा, पाळणाघरे आणि मुले सर्वाधिक वेळ जेथे एकत्र येतात अशी उद्याने पुन्हा सुरू करण्याची चर्चा सुरू आहे.
मुले करोनाच्या संसर्गापासून मुक्त नाहीत आणि त्यांच्यात संसर्गाशी संबंधित लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकरवी विषाणूचा प्रसार शक्य असल्याचे “एमजीएच’ मधील म्यूकोसल इम्युनोलॉजी अँड बायोलॉजी रिसर्च सेंटरचे संचालक ऍलेसियो फासानो म्हणाले.