पुणे-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू नागरिक मूळगावी, पर्यटनासाठी शहराबाहेर जाण्याचे नियोजन करत आहेत. मात्र, लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाल्याने अनेकजण खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडत आहेत. मात्र, आता दिवाळीच्या अनुषंगाने खासगी ट्रॅव्हल्स मालकांनीदेखील तिकिटाची दरवाढ केली आहे. मात्र, ही भाडेवाढ दरवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.
2 ते 6 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी आहे. शहरात अन्य जिल्ह्यांतून आलेले विद्यार्थी, नागरिक मूळगावी जातात. तर, अनेकजण लागून आलेल्या सुट्टीचा फायदा घेत पर्यटनासाठी जातात. ते एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या रेल्वेचेही आरक्षण मिळत नसल्याने बसेसकडे वळत आहेत. परंतु, ट्रॅव्हल्सचालकांनी दरवाढ केल्यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अनेकजण ऑक्टोबरपासूनच ट्रॅव्हल्सचे आरक्षण करतात. त्यामुळे दरम्यानच्या तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहेत. तर, अनेकांनी दिवाळीदरम्यान विशेष दर लागू केले आहेत. प्रवाशांची संख्या तुलनेने कमी आहे. यातच डिझेलचे दर फार वाढले आहेत. याचादेखील परिणाम दरवाढीवर झाल्याचे वाहतूकदार सांगतात.
गेल्या 18 महिन्यांपासून राज्यातील खासगी वाहतूक बसेस आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या असून सातत्याने वाढणाऱ्या डिझेल दरामुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे दिवाळीत नाईलाजास्तव बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. परगावातून किंवा परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अतिशय नगण्य असते. त्याचाही फटका दर वाढण्यावर होणार आहे.
– बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटना
मला दिवाळीनिमित्त पुणे ते नागपूर असा प्रवास करायचा आहे. रेल्वेला 500 रुपयांच्या आतच तिकीट असते. मात्र, रेल्वेचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे गावी जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा पर्याय आहे. पण खासगी ट्रॅव्हल्सकडून 3 हजारांच्या दरम्यान तिकीट आकारण्यात येत आहे.
– अमोल पाटील, नोकरदार
येथे तक्रार करता येणार
दिवाळीत खासगी वाहतूकदारांकडून तिकिटाचा दर दुपटी-तिपटीने वाढविला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही अशाप्रकारे भाडे आकारणी करण्याचे निर्देश खासगी वाहतूकदारांना देण्यात आले आहेत. मात्र, खासगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह dycommr.enf@gmail.com आणिmh14maharashtracom.in या ई-मेल तक्रार नोंदवावी, असे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.