मुंबई – अभिनेत्री कंगना रनौटला हरामखोर म्हटल्यानंतर त्याचा अर्थ नॉटीगर्ल असा होतो, अशी सारवासारव करणाऱ्या संजय राऊत यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी चागलाच टोला हाणला आहे. ते कल्पनेपेक्षा जास्तच नॉटी निघाले अशा शब्दात अमृता यांनी ट्विट केले आहे.
कंगनाला हरामखोर म्हणल्यानंतर त्याचा अर्थ नॉटीगर्ल असा होतो अशी सारवासारव शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतरही राऊत हेच सातत्याने टीकेचे धनी बनत आहेत. विशेषतः महिला वर्गाकडून राऊत यांच्या या वक्तव्यावर सातत्याने टीका होत आहे. त्यात आता पुन्हा एकदा अमृता यांनीही उडी घेत राऊत यांना लक्ष्य केले आहे.
मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनाविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. संजय राऊत यांनीही कंगनाला आपल्या राज्यात निघून जाण्याबाबत सांगितले होते. मात्र, मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असे आव्हान कंगनाने दिले होते. त्यावर राऊत यांनी तीचा उल्लेख करताना हरामखोर असा शब्द वापरला होता.
मात्र, त्यानंतर टीका सुरु झाल्यावर त्यांनी सारवासारव करताना हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी असा असल्याचे सांगितले होते. त्यावर अनेक स्तरांतून टीका सुरु झाली होती. याच प्रकरणात मत व्यक्त करताना अमृता यांनी राऊत यांना टोला हाणला आहे. इतकेच नाही तर आता सोशल मीडियावरही राऊत यांनी कंगनाची माफी मागावी, अशी मागणी होत आहे.