पुणे -सरकार धूम्रपान कमी व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. आता काही विमा कंपन्या धूम्रपान करणाऱ्यांसाठी विम्यासाठी अधिक हप्ता लावण्याबाबत विचार करीत आहेत. तसे झाले तर धूम्रपानास आळा बसू शकेल.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने नुकतीच एलआयसी जीवन अमर ही नवीन टर्म इन्शुरन्स योजना जाहीर केली. त्यात धूम्रपान करणाऱ्यासाठी व धूम्रपान न करण्यासाठी असे दोन वगळे विमा हप्ता दर आहेत. धूम्रपान करणाऱ्यांसाठी अधिक हप्ता असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी विम्याचा हप्ता कमी असणार आहे. ही योजना 5 ऑगस्टपासून लागू झाली आहे. या याजनेत कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत पॉलिसी उपलब्ध आहे. विमाधारकांना एकरकमी, नियमित, तसेच मर्यादित कालावधीसाठी विमाहप्ता भरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, सध्या अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार जीवन अमर योजनतेत कर सवलत उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
एलआयसीच्या पुणे विभाग (दोन)चे वरिष्ठ मंडळ व्यवस्थापक वरून कुमार खॉं यांनी ही माहिती दिली. यावेळी पुणे विभाग 1चे विपणन प्रबंधक अरुण कुमार नंदा तसेच विक्रय प्रबंधक सुरेश तैलंग उपस्थित होते.