नगर – मला मंत्रिपद मिळावे, यासाठी सर्वत्र चर्चा होत असते. माझ्यासाठी कार्यकर्ते सुद्धा वरिष्ठांना भेटले असतील. माझ्यासाठी पदापेक्षा काम महत्त्वाचे आहे. मतदारसंघातील अनेक प्रकारची कामे रखडली आहेत. त्यामुळे मला सर्व खात्यांची गरज आहे. मी कुठे जाऊ शकतो आणि काम करून घेऊ शकतो, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते. या महिनाअखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. तसेच महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून सध्या केवळ लोकहिताचे काम करण्यास आमचे प्राधान्य आहे.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये याची झलक जनतेने पाहिले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. महा विकास आघाडीच्या माध्यमातून राज्याला राजकारणाची वेगळी दिशा मिळाली. तसेच लोकांच्या हितासाठी जिल्ह्यात असेच समीकरण तयार व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे, असे सांगत पवार यांनी येत्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासाठी रोहित पवार यांनी स्पष्ट करून महा विकास आघाडीला एकत्र बांधण्याचे सूतोवाच केले आहे.
गेल्या तीस वर्षांपासून कर्जत-जामखेड विकास झाला नाही. एकाही विभागाचे काम पूर्णत्वाला गेले नाही. तो विकास फक्त कागदावर, छापलेल्या पुस्तकातच दिसत आहे, असा टोला तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांना आमदार पवार आज लगावला. पवार म्हणाले की, कर्जत जामखेडचे प्रश्न सुटले नाही. ज्यांनी निधी आणला व विकासाची कामे केली असे पुस्तकाच्या माध्यमातून मांडले ते पुस्तकावर राहिले, असा टोला त्यांनी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनी यांना लगावला. आगामी काळामध्ये आम्ही कर्जत जामखेड चा विकास करून दाखवणारच.