रानभाज्यांचे मानवी जीवनात अधिक महत्व

रानभाजी महोत्सव शेतकऱ्यांसाठी उपयुक्त : काडसिध्देश्वर स्वामीजी

Madhuvan

कोल्हापूर : निसर्गात उपलब्ध असणाऱ्या रानभाज्यांचे मानवी जीवनातील महत्त्व अधिक आहे, शेतकऱ्यांसाठी हा महोत्सव अधिक उपयुक्त तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम देणारा ठरेल, असे सिध्दगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी रानभाजी महोत्सवात मार्गदर्शनपर सांगितले.

आज कणेरी मठ येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर व कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव 2020 चे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी विविध रानभाज्यांचे महत्त्व विशद करण्यासाठी डॉ. मधुकर बाचुळकर यांनी आपल्या भारतात उपलब्ध असणाऱ्या विविध देशी रानभाज्यांचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि व्यापारी उपयुक्तता याबाबत ऑनलाईन वेबिनारद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल व पन्हाळा येथून शेतकऱ्यांच्या शेतातील रानभाज्यांचे नमुने या महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये अळू, तांदळी, कुर्डू, शेवगा, तांदुळजा, राजगिरा, अंबाडा, भुई आवळा, केना, गुळवेल, करटोली, सुरण, टाकाळा, गोडी कारली, रानवांगी, चिंचोली, नाळ, बांबू, उंबर इत्यादी नमुने प्रदर्शित करण्यात आलेले होते. रानभाजी महोत्सवांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.

या रानभाजी महोत्सवामध्ये प्रदर्शित रानभाज्यांचे प्रथम क्रमांक करवीर तालुक्यातील खटांगळे येथील शिवाजी दादू पाटील यांना देण्यात आला. तर, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथील जय हनुमान शेतकरी गट आणि पन्हाळा तालुक्यातील गोठने येथील भैरू आडुळकर यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ सिद्धनेर्ली येथील पंडित कृष्णा पवार व बाचणी येथील रघुनाथ महादेव कोकणे यांनी प्रदर्शित केलेल्या रानभाज्यांना देण्यात आले.

या रानभाजी महोत्सव कार्यक्रमात सिध्दगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी, सभापती पंचायत समिती करवीर अश्विनी धोत्रे, विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कोल्हापूर आत्मा प्रकल्प संचालक सुनंदा कु-हाडे, कृषी महाविद्यालय कोल्हापूर डॉ.अशोक पिसाळ, पंचायत समिती करवीर माजी उपसभापती मा. विजय भोसले तसेच सदस्य श्री मोहन पाटील ,महिला सदस्या सविता पाटील, अर्चना खाडे, योशोदा पाटील, मिनाक्षी पाटील, शोभा राजमाने, प्रतिभा ठोंबरे, कणेरी कृषी विज्ञान केंद्र दिपाली मस्के, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे, कृषी विभागाचे करवीर, कागल, पन्हाळा तालुक्यातील शेतकरी,अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे नियोजन उपविभागीय कृषि अधिकारी करवीर श्री.रविंद्र पाठक, श्री. दिपक देशमुख तालुका कृषि अधिकारी करवीर यांनी केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.