फक्त 5 टक्के कर आकारण्याची उत्पादकांची मागणी
पुणे – भारतात अजूनही 15 कोटी लोक 1,200 रुपयांपेक्षा कमी किमतीचे फीचर फोन वापरतात. मात्र, या फोनवरील जीएसटी तब्बल 12 टक्के आहे, तो 5 टक्के करण्याची मागणी अशा फोनच्या उत्पादकांनी केली आहे.
“महागड्या स्मार्टफोनवरील जीएसटी जास्त असण्याला आमची काही हरकत नाही. मात्र खेड्यातील गरीब लोक फीचर फोन वापरतात. त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य होते. त्यावरील जीएसटी 12% असण्याची गरज नाही,’ असे उत्पादकांनी जीएसटी परिषदेला आणि अर्थ मंत्रालयाला सांगितले आहे. जीएसटी परिषदेची बैठक या आठवड्यात होणार आहे.
या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी आशा इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन म्हणजे “आयसीईए’ने व्यक्त केली आहे. असे केले तर अशा प्रकारचे फोन भारतामध्ये तयार होण्यास आणि मेक इन इंडियाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. अशा फोनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पंकज महिंद्रू यांनी सांगितले.
भारतात मोबाइल फोन तयार करून निर्यात करणाऱ्या फोनवर अगोदर 4 टक्के निर्यात प्रोत्साहन देण्यात येत होते. मात्र, अचानक गेल्या आठवड्यात सरकारने ते 2 टक्के केले आहे. यामुळे निर्यात कमी होईल त्याचबरोबर फोनचे उत्पादन कमी होऊन रोजगारावर मोठा परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने मोबाइल निर्मात्यांना 110 अब्ज डॉलरचे मोबाइल निर्यात करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, अचानक ही सवलत काढून घेतल्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली.