सातारा – येथील विख्यात शिवाजी सर्कल या आठरस्त्याच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसराचे शीवतीर्थामध्ये रुपांतर करण्यात येत आहे. पोवई नाक्यावरील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी व ऐतिहसिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी नियोजन मंडळातून अडीच कोटींचा निधीची गरज होती. मात्र, त्यासाठी मोठा पाठपुरावा करण्याची गरज होती.
छत्रपते शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजपाचे विद्यमान राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी याविषयी मोठा आग्रह धरला होता. अखेर उदयनराजेंच्या आग्रहापुढे नमते घेत जिल्हा नियोजन समितीतून अडीच कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मान्य केले आहे. ही माहिती स्वत: खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातारा शहराला व जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा अनेकांना प्रेरणा देत असतात. काही ऐतिहासिक वास्तू काळाबरोबर नामशेष झाल्या तर काही वास्तु आजही अस्तित्वात आहेत. या वास्तूंचे जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकास साजेसा पुतळा पोवईनाका येथे आहे. या परिसराचे सुशोभीकरण आणि चबुतऱ्याची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.
या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामास सुमारे अडीच कोटी रुपये आवश्यक आहेत. ही तरतूद जिल्हा नियोजन समितीतून तातडीने करण्यात यावी, याबाबत उदयनराजे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी उदयनराजेंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.