प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – अंगणवाड्यांतील बालकांना नवीन आणि आनंददायी शिक्षण देण्यासाठी आणखी एक उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 30 हजार 320 ताईंना “स्टार्स’ प्रकल्पाअंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल. याचा कृती आराखडा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) तयार करत आहे. बालकांमध्ये अंगणवाड्यांची ओढ निर्माण व्हावी, यासाठी या ताईंची भूमिका महत्त्वाची ठरते. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सप्टेंबरपासून नोंदणी
राज्यात 43 हजार अंगणवाडी सेविका आहेत. सप्टेंबरपासून नोंदणी होऊन टप्प्याटप्प्याने सर्वांना प्रशिक्षण मिळणार आहे. दहा दिवसांचे 52 तासांचे प्रशिक्षण सोयीनुसार दिले जाणार आहे.
बालशिक्षण विभागाचा पुढाकार
बालशिक्षण विभागाच्या पुढाकाराने उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान हा प्रशिक्षण उपक्रम होणार आहे.
प्रशिक्षण कशासाठी?
बालकांच्या बौद्धिक विकासाचे ज्ञान मिळावे.
शिक्षण-आरोग्यासाठी कौटुंबिक वातावरण पोषक व्हावे.
बालकांमध्ये कृती व खेळाची आवड निर्माण करणे
बालकांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक असा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात 500 जणींना प्रशिक्षण
ऑनलाइन प्रशिक्षणासाठी लवकरच पायलट प्रोजेक्ट आधी राबविण्यात येणार आहे. यासाठी 500 अंगणवाडी सेविकांना समाविष्ट करुन घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे, तो त्यांना हाताळता येतो का, याचा आढावा घेतला जाईल.
हे.