पुणे – शहरात करोना बाधितांची संख्या दोन हजारांच्या घरात आहे. मात्र, आज बाधितांपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या सर्वाधिक 2 हजार 219 इतकी आहे. दिवसभरात 1 हजार 964 बाधित सापडले असून, 45 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2 हजार 963 वर पोहचली आहे.
गुरूवारी (दि. 17) दिवसभरात 6 हजार 549 संशयितांची तपासणी करण्यात आली. तर मागील दोन दिवसातील प्रतीक्षेत असलेले अहवालात 1 हजार 964 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत तब्बल 5 लाख 56 हजार 657 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 26 हजार 532 जणांना करोनाची लागण झाली आहे.
त्यातील 1 लाख 6 हजार 197 बाधित बरे झाले आहेत. शहरात सध्या 17 हजार 372 बाधित सक्रिय असून, त्यातील 939 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यातील 479 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 460 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मागील दोन दिवसांत सक्रीय बाधितांची संख्या दोनशे ते तीनशेने कमी झाल्याचे दिसून येते.