अधिकाधिक डॉक्‍टर्सनी जैविक कचरा निर्मूलनात सहभागी व्हावे

सुनील दंडवते : पास्को एन्व्हायरमेंटल सोल्युशन्सच्या संचालकांचे आवाहन

पुणे -पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत हजारो खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यापैकी स्वत:चे रुग्णालय नसलेले अनेक डॉक्‍टर्स, त्यांच्या डिस्पेनसरीज अथवा क्‍लिनिक्‍स जैविक कचरा निर्मूलन मोहिमेत नोंदणीकृत झालेले नाहीत. अशा सर्व डॉक्‍टर्सनी या मोहिमेत सहभागी होऊन आपले सामाजिक दायित्त्व निभवावे, असे आवाहन पुणे येथील जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) निर्मूलनातील अग्रेसर असलेल्या पास्को एन्व्हायरमेंटल सोल्युशन्सचे संचालक सुनील दंडवते यांनी केले आहे. शहराचे सार्वजनिक आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी बहुतांश वैद्यकीय व्यावसायिक आणि पॅथॉलॉजी लॅब्जनी जैविक कचरा निर्मूलनात सहभागी होत आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य निभावण्याची गरज असल्यावरही दंडवते यांनी भर दिला.

दै. “प्रभात’ आयोजित “ग्रीन गणेशा-2019’च्या निमित्ताने पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या “पास्को’चे संचालक सुनील दंडवते आणि प्रदीप मुळे दै. “प्रभात’शी बोलत होते.

“पास्को’ कंपनीच्या वाटचालीविषयी बोलताना दंडवते म्हणाले, “साधारणपणे ऐंशीच्या मध्य दशकात आम्ही विविध हॉस्पिटल्सना सर्जिकल आणि मेडिकल इक्विपमेंटस पुरवण्याच्या व्यवसायात आलो. त्यावेळी पिंपरी-चिंचवडच्या एका हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने आम्हाला जैविक कचरा निर्मूलनासाठी वापरला जाणारा इन्सिनरेटर बसवून देण्याची विनंती केली. त्यानुसार पुण्यातल्याच एका उत्पादक कंपनीकडून आम्ही असे इन्सिनरेटर्स बसवून द्यायची सुरुवात केली. मात्र, त्यावेळचे इन्सिनरेटर्स जुनाट पद्धतीचे होते. त्यामधील आधुनिक इन्सिनरेटर्स मिळायला सुरुवात झाल्यानंतर नव्वदच्या दशकात जैविक कचरा निर्मूलनाविषयीचा कायदाही लागू झाला. त्यामुळे केवळ इन्सिनरेटर्स बसवणे इतक्‍यापुरतीच आमची जबाबदारी न राहता, त्याच्या वापराचे प्रशिक्षण देणे, काही ठिकाणी स्वत: इन्सिनरेटर्स चालवणे यासह हॉस्पिटल्सकडून जैविक कचरा संकलन, त्याच्या वाहतुकीची यंत्रणा उभारणे, त्याआधी हॉस्पिटल्स आणि डॉक्‍टर्सना या मोहिमेत जोडणे आणि या संपूर्ण प्रक्रियेचे अहवाल, तपशील राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महापालिकांकडे पाठवणे अशा प्रक्रियेत “पास्को’ने प्रवेश केला.

आज महाराष्ट्रात जैविक कचरा निर्मूलन क्षेत्रात 33 कंपन्या असून त्यामध्ये “पास्को’ कंपनी सर्वांत अग्रभागी आहे. पुण्याच्या सर्व हॉस्पिटल्समधील दररोजचा 5 टन आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दीड टन जैविक कचरा 48 तासांत नाहिसा करण्याची जबाबदारी “पास्को’ पार पाडत आहे,’ असे सांगून दंडवते म्हणाले, “या व्यवसायात सर्वांत मोठी समस्या आहे ती जास्तीतजास्त खासगी क्‍लिनिक्‍स आणि डिस्पेनसरीजनी सहभागी होण्याची. दुसरी समस्या आहे, ती जैविक कचरा गोळा करतानाच न केल्या जाणाऱ्या वर्गीकरणाची. कचऱ्याच्या स्वरुपावरुन त्याचे वर्गीकरण योग्य प्रकारे गरजेचे असते.

घरगुती कचरा ओला आणि सुका असा वर्गिकृत करावा लागतो. मात्र, जैविक कचरा हा मानवी अवयव, रक्तयुक्त घटक, ब्लडबॅग्ज, एक्‍सपायरी औषधे, क्‍लिनिकल वेस्ट (पिवळा रंग), प्लॅस्टिक बॅग्ज, बॉटल्स, पाईप्स (केशरी रंग), सिरींजेस, नीडल्स, ब्लेड्‌स आणि स्काल्पेल्स (पांढरा रंग) आणि तुटक्‍या काचा, धातूची उपकरणे (हिरवा रंग) अशा प्रकारे रंगांनुसार वर्गिकरण करावे लागते, जे एक कठीण काम असते. मग असा कचरा गोळा करणे, वाहून नेणे, वाहन ट्रॅक करणे आणि कचरा विघटन करुन त्याचे अहवाल पाठवणे अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×