मावळातील निसर्ग सौंदर्याला धनिकांची दृष्ट

वनहक्‍क कायद्यांतर्गत जमीन मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल
डाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीत वन्यजीवांच्या अस्तित्त्वाला धोका
वनसंपदेवर कुऱ्हाड : वनक्षेत्राच्या 39 हेक्‍टर जमिनीवर व्यावसायिकाचा डोळा

टेकड्यांची लचकेतोड सुरूच…
मावळ ऍडव्हेन्चर अध्यक्ष विश्‍वनाथ जावलीकर म्हणाले की, मावळ तालुक्‍याच्या सौंदर्याला धानिकांनाची दृष्ट लागली. टेकड्या व वनक्षेत्राच्या जमिनीत अतिक्रमण व उत्खनन केले जात आहे. आता तर वन्यजीव वास्तव्यास असलेल्या वनजमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न चालला आहे. ही जमीन मावळ तालुक्‍यातील असून, या जमीनीवर मधुमक्षिका पालन व फळझाडे लावण्यासाठी पूर्वाश्रमीच्या आदिवासींना देण्यात यावी. मावळच्या वनजमिनी बळकावून मावळचे सौंदर्य नष्ट करणाऱ्यांच्या तीव्र आंदोलन करण्यात येईल.

आदिवासींच्या उदरनिर्वाहावर कुऱ्हाड – खांडभोर

सामाजिक कार्यकर्ते कैलास खांडभोर म्हणाले की, मे. महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने संकल्प फॉर्म विकत घेतले असून, त्यावरील 737 फळझाडांची कत्तल केली आहे. तसेच त्यांच्या जमिनीलगत वनविभागाची 39 हेक्‍टर जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ही जमीन या धनिकाला दिल्यावर वन्यजीव व आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे काय होणार ? ही जमीन द्यायची असेल, तर स्थानिक आदिवासींना द्या.

वडगाव मावळ – डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाहनगाव येथील वनक्षेत्राच्या 39 हेक्‍टर जमिनीवर खासगी बांधकाम व्यावसायिकाचा डोळा असून, वनहक्‍क कायद्यांतर्गत त्यांनी मागणी केली आहे. त्या वनक्षेत्रात पूर्वाश्रमीपासून अस्तित्वात असलेल्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल्या नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच भौतिक सुविधा मुबलक असलेल्या मावळ तालुक्‍यातील जमिनीचे आकर्षण महाराष्ट्रासह देशातील धनिकांना आहे. वनक्षेत्राच्या घनदाट जंगलाने मावळ तालुक्‍याच्या सौंदर्यात भर पडली आहे. या सौंदर्याला गेल्या दोन दशकांपासून दृष्ट लागली आहे.

मावळ तालुक्‍यातील टेकड्या व वनक्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व उत्खनन केले जात आहे. वनविभागाच्या वतीने जागतिक उष्णतापमान, पर्यावरणाचा ऱ्हास व बदलते हवामान आदींचा विचार करून 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवड चळवळ सुरू असताना मावळ तालुक्‍यात वनजमीन घेण्याचा डाव रचला जाता आहे. डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाहनगाव येथील वनक्षेत्राच्या 39 हेक्‍टर जमीन मे महर्षी वेदिक हेल्थ प्रा. लि. यांनी काही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांना हाताशी धरून वनहक्‍क कायद्यांतर्गत जमीन घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. त्या जमिनीची अद्यापही त्यांना परवानगी मिळाली नाही, त्या वनक्षेत्राच्या जमिनीत बेकायदा मोजणी करणे, वृक्षांना टॅगिंग करणे, रस्त्यात येणाऱ्या वृक्षांची कत्तल करणे. 20 वर्षांपूर्वी टाटा धरण व वनविभागाच्या वतीने एक रोपवाटिका सुरु करून त्या वनक्षेत्राच्या जागेत लाखो वृक्षांचे रोपण करण्यात आले.

आता ती झाडे सुमारे 30 फूट उंच वाढले असून, त्या ठिकाणी बहुसंख्येने वन्यजीव वास्तव्यास आहेत. ही जमीन टाटा धरणाच्या लगत असल्याने अनेकांचा डोळा त्या जमिनीवर आहे. सद्यस्थितीला अब्जावधी किमंतीची जमीन लाटण्याचा प्रयत्न होत आहे. या परिसरात संकल्प फॉर्मच्या शेकडो एकर जमिनीवरील 737 फळझाडे तोडून परिसर ओसाड केला आहे.

ही वनजमीन खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातल्यावर वन्यजीवांच्या अस्तित्वाचे काय होणार असा पायंडा पडल्यावर वनजमिनी खासगी धनिकांच्या घशात जातील. मावळ तालुक्‍यातील नैसर्गिक सौदर्य संपायला वेळा लागणार नाही. वनविभागाला वनजमिनी द्यायच्या असतील, तर त्या ओसाड वनजमिनी फळबागांसाठी देण्यास हरकत नाही; पण त्या ठिकाणी सिमेंट जंगले न उभारता केवळ वृक्षारोपण करावे.

या वन जमिनीवर वन्यजीव व आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असून, एका धनिकांच्या हट्टापायी अनेकांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मे. महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वनजमीन ताब्यात घेण्याच्या कृतीला सर्वच स्थरातून तीव्र विरोध होत असून, जर वनजमीन या खासगी धनिकाला दिल्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मावळ ऍडव्हेन्चर अध्यक्ष विश्‍वनाथ जावलीकर, ऍड. रवींद्र यादव, विनोद ढोरे, चंद्रशेखर खांडभोर, प्रतीक जुन्नरकर, संदीप नाणेकर, दिगंबर पडवळ, सतीश धामणकर, ग्रामस्थांनी केली आहे.

मे. महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड यांनी डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाहनगाव येथील वनक्षेत्रातील 39 हेक्‍टर जमीन वनहक्‍क कायद्यांतर्गत जमीन मिळण्यासाठी प्रस्ताव कार्यालयात दाखल केला आहे. त्यांना अद्यापही परवानगी दिली नाही. त्यांनी वृक्षतोड व उत्खनन केले असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मावळातील घनदाट वनक्षेत्र वन आणि वन्यजीवांसाठी राखीव आहे.

– पोपट कापसे, प्रमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरोता.

वनखात्याकडून 39 हेक्‍टर जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जागेवर गोशाळा आणि आयुर्वेदिक झाडांचे रोपण केले जाणार आहे. याशिवाय भारतीय संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने आयुर्वेदाचा प्रकल्प याठिकाणी उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

– गिरीधर काळे, प्रमुख, महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड..

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.