मॉंट्रियल – स्पेनच्या राफेल नदालने मॉंट्रियल टेनिस स्पर्धेत एकतर्फी विजेतेपद पटकाविले. त्याने अंतिम सामन्यात डॅनिली मेदवेदेव याचा 6-3, 6-0 असा दणदणीत पराभव केला.
नदालने या स्पर्धेत पाचवे अजिंक्यपद मिळविताना पासिंग शॉट्स व वेगवान सर्व्हिसवरील आपली हुकमत सिद्ध केली. मेदवेदेवने पहिल्या सेटमध्ये सुरूवातीला चांगला खेळ केला होता. मात्र नंतर नदालने कोर्टच्या दोन्ही बाजूंना परतीचे झंझावती फटके मारत त्याचा बचाव निष्प्रभ ठरविला. सर्व्हिसब्रेक करीत नदालने हा सेट मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग केला. त्यामुळे मेदवेदेवला एकाही गेममध्ये सर्व्हिस राखता आली नाही. तसेच त्याला नदालच्या सर्व्हिसवर आक्रमक परतीचे फटके मारता आले नाहीत.
सामना संपल्यानंतर नदालने सांगितले की, मेदवेदेव हा खरा गुणवान खेळाडू आहे. त्याच्याकडून चिवट लढतीची मला अपेक्षा होती. मात्र त्याच्याकडून निराशाजनकच खेळ झाला. माझ्या खेळाबाबत मी समाधानी आहे. आगामी अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी मला हे विजेतेपद महत्त्वाचे आहे. या स्पर्धेसाठी आपण किती तंदुरूस्त आहोत याचाही मला येथील स्पर्धेद्वारे घेता आला आहे.
मेदवेदेव याने सांगितले की, अपेक्षेइतका मी तंदुरूस्त नव्हतो. तरीही मी हा सामना खेळलो. नदालच्या आक्रमक खेळापुढे मला परतीचे फटके मारणे जड जात होते. मला सर्व्हिसवरही नियंत्रण ठेवता आले नाही. अर्थात येथील उपविजेतेपदही मला आगामी करिअरसाठी प्रेरणादायक आहे.
दरम्यान नदालने सिनसिनाटी येथे होणाऱ्या एटीपी स्पर्धेतून माघार घेतली आहे. याबाबत नदालने सांगितले की, अमेरिकन स्पर्धेपूर्वी मला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळेच मला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे.