अबाऊट टर्न: अक्राळविक्राळ

हिमांशू

“येती’ अर्थात हिममानवाच्या पावलांचे ठसे हिमालयात दिसून आल्यानंतर हा मानवसदृश प्रचंड प्राणी किंवा प्राणीसदृश प्रचंड मानव पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हिममानवाला पाहिल्याचा दावा आतापर्यंत अनेकांनी केलाय. त्यात गिर्यारोहकांपासून तिबेटमधल्या बौद्ध मठांतील साधकांपर्यंत अनेकांना म्हणे तो दिसलाय; परंतु त्याच्या अस्तित्वाचे पुरावे कुणीच देऊ शकलेला नाही. अशा गूढ गोष्टी पाहिल्याच्या कहाण्या आणि कोकणातल्या भुताटकीच्या कहाण्यांमध्ये फारसा फरक नसतो. “चकवा’ नावाची भुताटकी कोकणात अनुभवलेली माणसे आपल्याला हमखास भेटतात.

रात्रीच्या वेळी इतक्‍या वळणावळणांचा प्रवास करताना रस्ता चुकणारच. मग या मंडळींना दौलताबादच्या किल्ल्यातल्या भूलभुलैयाप्रमाणे कुठूनही गेले तरी एकच ठिकाण पुनःपुन्हा दिसते. सकाळ झाल्यावर रस्ता आपोआप सापडतो. त्याचप्रमाणे हिममानव वगैरे मंडळीही रात्रीच फिरतात. त्यावेळी जग झोपलेले असते आणि सकाळी त्याच्या पावलांचे ठसे दिसतात. हिममानव मात्र दिसत नाही. तसे पाहायला गेले तर जिथे फक्‍त बर्फ आणि बर्फच आहे, अशा भागात पावलांच्या ठशांचा माग काढत थेट हिममानवाच्या घरापर्यंत पोहोचणे फारसे अवघड नसावे; परंतु गिर्यारोहणासाठी गेलेली माणसे अशा गोष्टींत वेळ कशाला घालवतील? पूर्वी एका फोटोग्राफरलासुद्धा हिममानव दिसल्याचे सांगितले गेले होते. पण फोटोग्राफरला नेमका हिममानवाचाच फोटो मिळाला नाही. नेपाळच्या संग्रहालयात हिममानवाचे बोट जपून ठेवलंय. पण तपासणीत ते बोटसुद्धा माणसाचेच असल्याचे निष्पन्न झालेय.

असा हा बहुचर्चित हिममानव आम्हाला मात्र काल साक्षात्‌ भेटला. आमच्याशी बोलला. हो, हिममानव आपल्यासारखे बोलतो. ज्या प्रांतात जाईल, तिथली भाषा त्याला समजते. बर्फाची पांढरीशुभ्र चादर क्षितिजापर्यंत पसरलेली होती. तापमान शून्यापेक्षाही खाली सरकले होते. अंगात (अर्थातच आमच्या) हुडहुडी भरली होती. शेकोटी पेटवायला लाकडे नव्हती. नाइलाज म्हणून चालत होतो; पण थंड हवेमुळे थकवा जाणवत नव्हता. घामाचे तर नावही विसरलो होतो. अशा वेळी हा धिप्पाड हिममानव अचानक समोर उभा ठाकला. “घाबरू नकोस,’ असे म्हणून खाली बसला.

विचित्र चेहरा; पण माणसासारखा! दोन पायांवर चालत आला म्हणजे नक्‍कीच माणूस! पण त्याच्याशी बोलायचे काय, हे सूचेना. “इकडे कसे काय?’ असा त्यानेच प्रश्‍न केला. मग आम्ही आपल्याकडची परिस्थिती सांगितली. उष्णतेची लाट, 46 अंशावर गेलेला पारा, आटलेल्या विहिरी, सुकलेले तलाव, संकोचलेली धरणे आणि बरेच काही… आम्ही त्या बर्फाळ प्रदेशात पर्यटनासाठी आलो आहोत, हे कळल्यानंतर “घरात एसी नाही का?’ असा प्रश्‍न त्याने विचारला. “पंखा आहे; पण आज पॉवर कट असल्यामुळे…’ आम्ही एवढे बोलल्यावर जोरजोरात हसत तो उठला आणि चालू लागला. त्या हसण्याच्या भीतीने त्याचा फोटो काढणे राहूनच गेले!

…अचानक पंखा सुरू झाला आणि शेजारच्या टेबलावर ठेवलेला पेपर फडफडू लागला. तारवटलेल्या डोळ्यांनी पेपरकडे पाहिले. त्यात बातमी होती रामनगरच्या जंगलातली. जीपमध्ये बसलेल्या पर्यटकांनी हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि चिडलेल्या हत्तीने जीपवर हल्ला केला, असा मजकूर वाचून दीर्घ सुस्कारा सोडला. हुश्‍श! बरे झाले आपण हिममानवाचा फोटो नाही काढला. अक्राळविक्राळ बनत चाललेल्या जगात अक्राळविक्राळ जीव भेटणारच. पुरावा म्हणून त्यांचे फोटो कशाला काढायचे? धन्यवाद हिममानवा!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.