देवरिया – उत्तर प्रदेश पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे पोलीस दलाची मान शरमेने झुकली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील एक महिला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. यावेळी तेथील स्टेशन हाऊस अधिकारी भीष्म पाल सिंह याने निर्लज्जपणाच्या सर्व सीमांचे उल्लंघन करत तक्रारदार महिलेसमोरच हस्थमैथुन करण्यास सुरुवात केली. तसेच सदर महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास देखील नकार दिला.
या किळसवाण्या घटनेची माहिती देताना महिलेने सांगितले की, “मी तक्रार दाखल करण्यासाठी माझ्या पालकांसह एकूण तीन वेळा पोलीस ठाण्यात गेले. पहिल्या दोन वेळेस मी पोलीस अधिकारी भीष्म पाल सिंह यांच्या ‘त्या’ किळसवाण्या हालचालींकडे दुर्लक्ष केले. मात्र तिसऱ्या वेळीही त्यांनी आपल्या किळसवाण्या हालचाली सुरूच ठेवल्याने मी त्याचा व्हिडीओ काढून समाज माध्यमांवर प्रसारित केला.”
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर घडलेल्या प्रकरणाची दखल देवरिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीपती मिश्रा यांनी घेतली असून सदर पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्यात आले असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून भीष्म पाल सिंह हा फरार झाला असून उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याचा शोध घेणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. या लाजिरवाण्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर नेटकाऱ्यानी उत्तर प्रदेश पोलिसांबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.