मुंबई – केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे. पुढील 48 तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही धडकण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकले आहे. कर्नाटकच्या काही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याशिवाय बंगालच्या उपसागराचा भागही व्यापला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्राचा मध्य भाग आणि गोवा, महाराष्ट्रच्या किनारपट्टीला मान्सून धडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागरिक उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.