Monsoon T20 Cup 2024 :- वेदांत देडगेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एलिट इगल्स संघाने सेंचुरी क्रिकेट अकादमीला पराभूत करताना मान्सुन करंडक आंतरक्लब टी-२० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना एलिट ईगल्स् संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १२४ धावा केल्या. यामध्ये पुष्कराज खराडेने ३७, साकिब खानने २७ तर वेदांत देडगेने नाबाद १४ धावांची खेळी करताना संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. सेंचुरीच्या कौशल विरपणकरने २९ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले.
सेंचुरी क्रिकेट अकादमी संघाचा डाव १९.४ षटकांत सर्व बाद ११७ धावांवर संपुष्टात आला. अनिकेत पातारेने २७, इसा महाडिकने ३६ तर केदार बजाजने १६ धावा करताना चांगली लढत दिली. वेदांत देडगेने १३ धावांमध्ये ३ तर शिवम पादूळेने २९ धावांमध्ये २ गडी बाद करताना संघाला विजय मिळवून दिला.
अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्रीय मंडळाचे सहकार्यवाह रोहन दामले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक विक्रम देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट खेळाडू : अनिकेत कुडूक (१४२ धावा आणि १४ विकेट ; आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमी);
सर्वोत्कृष्ट फलंदाज : सार्थक ढमढेरे (२६६ धावा, कारभारी क्रिकेट अॅकॅडमी);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : हर्ष बानगे (१३ विकेट, सेन्चुरी क्रिकेट अॅकॅडमी);