मान्सूनपूर्व पावसाने वीज यंत्रणा कोलमडली; पाच तास बत्ती गूल

पुणे – पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने यंदा लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, पहिल्याच पावसाने महावितरणची यंत्रणा अक्षरश: उन्मळून पडली. पावसामुळे शहर आणि उपनगराच्या बहुतांशी भागातील बत्ती गुल झाली होत्री गेल्या चार दिवसांच्या कालावधीत महावितरणच्या विविध कार्यालयामध्ये बिघाडाच्या तब्बल दोन हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत.

प्रशासनाकडे विद्युत सहायकांची तब्बल 30 टक्के जागा रिक्त असल्याने हा बिघाड दूर करण्यास प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका शहरातील वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

महावितरणची शहर आणि उपनगरातील यंत्रणा खूप वर्षांपूर्वीची आहे. पावसाळ्यात ही यंत्रणा सक्षम असावी, यासाठी दरवर्षी या यंत्रणेची दुरुस्ती करण्यात येते. यंदाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच ही दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली होती. त्यासाठी बहुतांशी भागातील वीजपुरवठा संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येत होता. त्यामुळे पावसाळ्यात काही अपवाद वगळता वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.

मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांत सिंहगड रस्ता, पद्मावती, नगर रस्ता, धानोरी, भवानी पेठ, कासेवाडी, शहराच्या मध्यवस्तीचा बहुतांशी भागांमध्ये तब्बल चार ते पाच तास बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढले आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने हे बिघाड दूर करण्यास तासन्‌तास लागत आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिक्रियेसाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.