पुणे – पावसाळ्यात नाले-ओढ्यांना प्रचंड पूर येऊन रहिवासी भागात होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्यांच्या बाजूने संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. नुकताच राज्य सरकारने यासाठी महापालिकेला २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. कोथरूड मतदारसंघात १९.९० कोटी रुपये खर्च करून संरक्षक भिंती बांधणार आहे, असे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले.
ते म्हणाले, की २०१९ मध्ये मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्यासह अनेक नाल्यांना आणि ओढ्यांना प्रचंड पूर आला होता. सोसायट्यांच्या सीमाभिंती कोसळल्या आणि मोठे नुकसान झाले. औंध- पाषाणसह सोमेश्वरवाडी, बाणेर- बालेवाडी भागातील पूरसदृश परिस्थिती नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने झाली होती. त्यामुळे महापालिकेने सर्व भागांचे सर्वेक्षण करून नाल्यांना संरक्षक भिंती उभारण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जुलै महिन्यात दिले होते, असेही ते म्हणाले.
पूरग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या आणि नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने सोसायटी भाग आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची बाब नागरिकांनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर नाल्यांना संरक्षक भिंत उभारण्यासाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या होत्या.
ज्या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची रुंदी वाढविणे आवश्यक आहे, त्याचेही सर्वेक्षण करून त्यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी आमदार निधीतून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
कोथरूडसह इतर पूरप्रवण नाल्यांच्या बाजूने संरक्षक भिंती बांधण्यासाठी पाटील सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असल्यामुळे शहरात नाल्याच्या पुरामुळे नागरिकांना निर्माण होणारा धोका कमी होणार आहे. पुणेकरांची दीर्घकाळची समस्या सुटणार आहे.
खडकवासला मतदारसंघात ४१.२३ कोटी, शिवाजीनगर मतदारसंघात २४.८० कोटी, कॅन्टोन्मेंट भागात ३९.०४ कोटी, पर्वती परिसरात ४१.१५ कोटी आणि कोथरूड मतदारसंघात १९.९० कोटी रुपये खर्च करून संरक्षक भिंती बांधल्या जाणार असून, त्याच्या निविदा काढण्यात आल्याचेही पाटील म्हणाले. या वेळी कोथरूड परिसरातील भाजपा आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.