हवामानशास्त्र विभागाचे स्पष्टीकरण
पुणे – यंदा मान्सून (मोसमी पाऊस) कसा असणार किती पडणार, याबाबत आत्ताच लगेच अंदाज वर्तविणे योग्य नसले तरी यंदा मात्र देशात पाऊस चांगला बरसणार अशी चिन्हे दिसत आहेत. मान्सूनवर “एल-निनो’चा प्रभाव फारसा होईल, असे वाटत नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेतील हवामान विषयक अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने “भारतातील मान्सूनवर यंदा “एल-निनो’चा प्रभाव राहील,’ असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, मान्सून कसा असेल, याबाबतचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाच्यावतीने दरवर्षी वर्तविला जातो. पण, हा अंदाज साधारणत: एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो. सध्या हवामानाचा अभ्यास करुन अंदाज तयार करण्याचे कामच हवामान विभागाच्यावतीने सुरू आहे. त्यामुळे मान्सूनबाबत आताच अधिक माहिती देणे योग्य नाही, तरी सुद्धा यंदा मान्सून चांगला बरसणार आहे,असाही दावा संशोधकांनी केला आहे.
“एल-निनो’चा प्रभाव यंदा फारसा जाणवेल, असे वाटत नाही. मान्सूनवर परिणाम करणाऱ्या “एल-निनो’ची निर्मिती कधी होऊ शकते, त्याचबरोबर मान्सूनच्या काळात ती कितीवेळा होईल, याचे कुठलेही स्पष्ट संकेत सध्या नाहीत. त्यामुळे “एल-निनो’मुळे पाऊस काही वेळा कमी होतो, तर काही वेळा “एल-निनो’सारखी उलटी स्थिती झाली तर पाऊस जास्तसुद्धा होतो. त्यामुळे यंदाच्या मान्सूनबाबत थोड्याच दिवसांत पूर्ण अंदाज वर्तविणे शक्य होईल, असेही हवामान विभागाच्या सूत्रांनी म्हटले आहे.