मान्सून कोकणात दाखल

पुणे – गेल्या महिनाभरापासून चातकासारखी ज्याची वाट पाहिली जात होती, तो मान्सून अखेर गुरुवारी कोकणात दाखल झाला. हवामान खात्याने सुद्धा मान्सून दक्षिण कोकण आणि गोव्यात पोहोचल्याचे जाहीर केले आहे.

नियोजित वेळेपेक्षा 8 दिवस उशीराने केरळात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल ही वायू चक्रीवादळामुळे संथ झाली होती. या वादळाने मान्सूनचे बाष्प शोषून घेतले होते. हे वादळ क्षिण झाल्यानंतर मान्सूनने पुन्हा वाटचाल सुरू केली. त्याप्रमाणे 14 जूनला मान्सूनने केरळाचा संपूर्ण भाग व्यापला आणि त्याने दक्षिण कर्नाटकमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 18 जूनच्या आसपास त्याने संपूर्ण कर्नाटक व्यापला. त्याचवेळी कोकण आणि गोव्यात पूर्व मोसमीपावसाने हजेरी लावत मान्सून लवकर येत असल्याची चाहुल दिली होती. गुरुवारी अखेर मान्सूनने प्रगती करत गोवा आणि दक्षिण कोकणसह दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत मजल मारली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनची वाटचाल आता वेगाने सुरू होणार असून येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडेल, विशेष करून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.