मान्सून क्रिकेट लीग : 11 एसेस संघाला विजेतेपद

पुणे  – स्पार्टन क्रिकेट क्‍लबतर्फे आयोजित पहिल्या स्पार्टन मान्सून क्रिकेट लीग अजिंक्‍यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत 11 एसेस संघाने पुणे रेंजर्स क्रिकेट क्‍लबचा 20 धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

कोद्रे फार्म्स, सिंहगड रोड येथील मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात निखील जैन याने फटकावलेल्या 47 धावांच्या जोरावर 11 एसेस संघाने विजयाला गवसणी घातली. पहिल्यांदा फलंदाजी करताना 11 एसेस संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावांचे आव्हान उभे केले. हिकांत कामदार (31 धावा) आणि साजन मोदी (20 धावा) यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली. पण वरुण गुजर (48 धावा) आणि निखील जैन (46 धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 25 चेंडूत 65 धावांची भागीदारी करून संघाला 200 धावांचे शिखर गाठून दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे रेंजर्स क्रिकेट क्‍लबची सुरुवात खूपच खराब झाली.

सातव्या षटकामध्ये 5 बाद 31 धावा असा संघ अडचणीत आला होता. कौस्तुभ बाकरे याने 51 चेंडूत 13 चौकार व 2 षटकारांसह 82 धावा करत पुणे रेंजर्सकडून एकाकी झुंझ दिली. त्याची ही खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही आणि संघाचा डाव 19.2 षटकांत 179 धावांवर आटोपला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण कॅप्टन नीलेश गायकवाड आणि कोद्रे फार्म्सचे विक्रम देशमुख यांच्या हस्ते पार पडला.स्पर्धेतील विजेत्या 11 एसेस आणि उपविजेत्या पुणे रेंजर्स क्रिकेट क्‍लब संघाला करंडक देण्यात आला. स्पर्धेत तिसरे स्थान मिळवणाऱ्या स्टॅलियनस क्रिकेट क्‍लबला करंडक देण्यात आला.

याशिवाय स्पर्धेत वैयक्‍तिक पारितोषिकेही देण्यात आली. सर्वोत्कृष्ट फलंदाज- भूषण सावे (मॅव्हरिक्‍स 11, 357 धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज- पंकज गोपालनी (11 एसेस, 15 विकेट) आणि मालिकावीर हा किताब कौस्तुभ बाकरे (पुणे रेंजर्स, 207 धावा व 12 विकेट) याला देण्यात आला. स्पर्धेचे संचालक आणि संयोजक ऋषिकेश पुजारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर स्पर्धा संचालक अमित देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संक्षिप्त धावफलक :

अंतिम सामना :11 एसेस ः 20 षटकांत 6 बाद 201 धावा. (वरुण गुजर 48, निखील जैन 46, हिकांत कामदार 31, प्रतीक वाघेला 21, कौस्तुभ बाकरे 2-30, अम्रित अलोक 2-33) वि. वि. पुणे रेंजर्स क्रिकेट क्‍लब ः 19.2 षटकांत सर्वबाद 179 धावा. (कौस्तुभ बाकरे 82, निखील नासेरी 22, पंकज गोपालणी 3-31, फर्शे अन्सारी 2-25). सामनावीर ः निखील जैन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.