मेलबर्न – भारतीय संघाविरुद्धच्या 2007-08 साली झालेल्या मालिकेत घडलेल्या मंकीगेट प्रकरणामुळे माझी अत्यंत यशस्वी कारकीर्द बदनाम झाली, या घटनेमुळे मी खूप निराश झालो होते, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतीय संघाविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ऍण्ड्रयु सायमंड्सला माकड असे संबोधले होते. हरभजनने हे आरोप जरी फेटाळले होते तरीही व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहून सामनाधिकारी व पंच यांनी त्याला दोषी ठरविले व त्याच्यावर 3 सामन्यांची बंदी लावली. या काळात जितक्या वेळा याप्रकरणी चौकशी, जबाब व सुनावणी झाली त्याला मी प्रत्येकवेळी उपस्थित होतो. यामुळे आमच्या संपूर्ण संघावर प्रचंड दडपण निर्माण झाले होते.
एका यशस्वी संघाचा कर्णधार म्हणून हे प्रकरण माझ्यासह सर्व खेळाडूंसाठी खूपच निराश करणारे ठरले होते. त्यानंतरच्या पर्थ येथे झालेल्या कसोटीत आम्हाला विजयाची संधी होती, मात्र खेळाडूंची कामगिरी या तणावामुळे सुमार झाली व हा सामना आम्ही गमावला. ही मालिका देखील आम्ही गमावली.
मॅथ्यू हेडन, मायकल क्लार्क व मी हरभजनच्या विरोधात साक्ष दिली होती. या संपूर्ण घटनेचा माझ्यावर नकारात्मक परिणाम झाला होता. एक यशस्वी कारकीर्द अंशत: का होईना पण बदनाम झाली आणि याची मला आजही खंत वाटते असेही त्याने सांगितले.