पुणे -टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघात भारतीय रेल्वेच्या तिकीट तपासणी विभागात सेवेत असलेल्या चार महिला खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. मोनिका मलिक, वंदना कटारिया आणि रजिनी एतिमारपू यांनी 2018 साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा
स्पर्धेत रजतपदक पटकाविले होते. या खेळाडूंकडून टोकियोत सरस कामगिरीची अपेक्षा आहे.
टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या संघात 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या हॉकीपटूंचा समावेश असून, या संघाचे नेतृत्व राणी रामपाल करणार आहे. 16 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील 13 खेळाडू या भारतीय रेल्वेत कार्यरत असून, त्यापैकी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कार्यरत असणाऱ्या 4 जणींचा समावेश आहे. या खेळाडू गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेकडून सराव करत असून, विविध स्पर्धांमध्ये खेळत आहेत. या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्राप्त हेलन मेरी, राष्ट्रीय हॉकीपटू आणि मध्य रेल्वेच्या कर्मचारी सरिता गोव्हर प्रशिक्षण देत आहेत.
मलिकने आशियाई स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहे. तिने 2018 साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांत रजतपदक आणि 2014 साली इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धांत ब्रॉन्झपदक पटकाविले आहे. यासह 2017 साली गिफू येथे झालेल्या आशियाई करंडक
स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमधील पदकाची आशा वाढली आहे.
वंदना कटारियाने देखील 2018 साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांत रजतपदक आणि 2014 साली इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धांत ब्रॉन्झपदक मिळवले होते. तर, गिफू येथे झालेल्या आशियाई करंडक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. यासह सुशिला चानू बचावपटू असून, 2014 साली इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धांत ब्रॉन्झपदक आणि 2013 साली युवा विश्वकरंडक स्पर्धेतही ब्रॉन्झपदक मिळवले होते. तर, गोलरक्षक असणाऱ्या रजिनी एतिमारपूला 2013 साली सर्वोत्तम गोलरक्षक हा पुरस्कारही मिळाला होता. 2018 साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांत रजतपदक आणि 2017 साली गिफू येथील आशिया करंडक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
सर्व खेळाडू आमचा अभिमान – रेल्वे
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोनिका मलिक, वंदना कटारिया, सुशिला चानू, रजिनी एतिमारपू या चौघीदेखील मुख्य तिकीट तपासणीस म्हणून (हेड टीसी) कार्यरत आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील सदस्यांमध्ये मध्य रेल्वेच्या खेळाडूंच्या समावेशाने रेल्वे प्रशासनाने आनंद व्यक्त केला आहे. मध्य रेल्वेसाठी हे अभिमानास्पद आहे, अशी भावना रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.