भाजपचे वरातीमागून घोडे : शहराध्यक्षांनी वॉर्डस्तरीय निधी देण्याचे नगरसेवकांना “कम्पल्शन’
पुणे – कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पुराने थैमान घातले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तेथे मदतीचा ओघ सुरू असून, अनेकांनी या कार्याला मदतीचे हात दिले आहेत. पण, असे असताना पुण्यातील “भाजपेयीं’चे मात्र “वरातीमागून घोडे’ असा प्रकार झाला आहे.
देशभरात कोठेही जेव्हा नैसर्गिक संकट कोसळते, तेव्हा मदतीचे अनेक हात लगेचच धावून येतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारीच सर्व खासदार, आमदार आणि नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने काहीच हालचाल केली नाही.
महापौरांनी शनिवारी (दि. 10) एक महिन्याचे मानधन देण्याचे आवाहन नगरसेवकांना केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या आधीच एक महिन्याचे आपले मानधन पूरग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले असून, दोन ट्रक मदतही या भागात पाठवली आहे. दरम्यान, शहराच्या प्रथम नागरिक आणि महापौर म्हणून “आदेश’ न देता “मानधन द्या’ असे “आवाहन’ महापौरांना करावे लागले आहे. वास्तविक त्यांनी या संदर्भात आदेश देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी केवळ आवाहनापर्यंतच आपले अधिकार सीमित ठेवले.