फायनान्स कंपनीमध्ये पावणेपाच लाखांची चोरी

मलकापूर येथील घटना; रोकड घेऊन कपाट टाकले शेतात

कराड – मलकापूर येथील खरेदी विक्री सोसायटी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एच. बी. डी. फायनान्स कंपनीचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. ही घटना सोमवार, दि. 2 रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी कपाटातील पावणेपाच लाख रुपयांची रोकड चोरून सदरचे कपाट जवळ असलेल्या शेतात टाकल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, तेथून जवळच असलेल्या महिंद्रा फायनान्स कंपनीमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. याबाबत फायनान्स कंपनीचे सेल्स मॅनेजर संदीप बाबर यांनी कराड शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, मलकापूर येथे खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंपाशेजारी एच. बी. डी. फायनान्स कंपनीचे ऑफिस आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेपाच वाजता ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी ऑफिस बंद केले.

रविवारी सुट्टी असल्याने ऑफिस उघडण्यात आले नाही. मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास फायनान्स कंपनीच्या शेजारील कुरिअर ऑफिसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याने सेल्स मॅनेजर बाबर यांना फोन करून तुमच्या फायनान्स ऑफिसला लावलेल्या शटरची कुलपे तोडलेली दिसत आहेत, असे सांगितले. यावर सेल्स मॅनेजर बाबर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

यावेळी ऑफिसमध्ये  रोकड ठेवलेले लोखंडी कपाट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला जाऊन पाहणी केली असता ऑफिसच्या पाठीमागे असलेल्या शेतात ते कपाट आढळून आले. मात्र चोरट्यांनी ते कपाट तोडून त्यातील 4 लाख 71 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बाबर यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याचा विरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान, या चोरट्यांनी मलकापूरातील महिंद्रा फायनान्स कंपनीच्या खिडकीतून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आलेले नाही. या घटनेची नोंद पोलीसात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.